

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कर्जाशी संबंध नसताना रेल्वे फाटक परिसरात कार्यालय असणार्या एका फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकारी, कर्मचार्यांकडून वारंवार येणारे फोन, धमक्या, यामुळे संतप्त झालेल्या अर्जुन कोरे या तरुणाने बुधवारी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतचा गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पुण्यातील एका व्यक्तीने फायनान्सकडून आयफोन खरेदी केला होता; मात्र हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचार्यांनी नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून पैसे भरण्याची मागणी केली. मात्र, हा मोबाईल क्रमांक अर्जुन कोरे (रा. शाहूपुरी, गवत मंडई) या तरुणाचा होता. अर्जुनने या कर्जाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे निदर्शनास आणून देऊनही फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचार्यांकडून त्याला वारंवार फोनवरून धमकी दिली जात होती. अर्जुनने रेल्वे फाटक परिसरात कंपनीच्या कार्यालयात जाऊन फोनवरून धमक्या येत असल्याचे सांगितले. यावेळी कर्मचार्यांनी पुणे कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित तरुणाचा मोबाईल क्रमांक बदलण्यास सांगितले. मात्र, याचवेळी कोरे याला पुन्हा पुण्यातून वसुली कर्मचार्यांनी फोन करून धमकी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरे याने कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.