कोल्हापूर : ८५ ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल | पुढारी

कोल्हापूर : ८५ ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 85 ग्रामपंचायतींसाठी लवकरच सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाला बुधवारी मान्यता देण्यात आली. दि. 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य धरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षात मुदत संपणार्‍या तसेच नवनिर्मित आणि 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणुका न झालेल्या राज्यातील एकूण 2 हजार 289 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींचा समावेश होता. मात्र, राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समर्पित मागासवर्ग आयागाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतींसह 62 ग्रामपंचायती वगळण्यात आल्याने राज्यातील 2 हजार 227 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले.

जिल्ह्यात 21 जून रोजी आरक्षण काढण्यात आले. त्यावर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी प्रभाग आरक्षणाला बुधवारी (दि. 12) अंतिम मान्यता दिली. दरम्यान, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून दि. 31 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर दि. 7 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्यावर निर्णय घेऊन दि. 11 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या गावांतही उडणार रणधुमाळी

करवीर तालुक्यातील वाशी, शिरोली दुमाला, चिंचवाड, बहिरेश्वर, भुदरगड तालुक्यातील गारगोटी, राधानगरी तालुक्यातील सरवडे, कसबा वाळवे, शाहूवाडीतील माण, वालूर, सुपात्रे, चंदगडमधील कडलगे खुर्द, कानूर खुर्द, तुर्केवाडी, माणगाव, सडेगुडवळे आदी महत्त्वाच्या गावांसह 85 गावांत येत्या एक-दोन महिन्यांत रणधुमाळी उडणार आहे.

जिल्ह्यातील निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायती

करवीर : 10       चंदगड : 22
पन्हाळा : 14      राधानगरी : 12
शाहूवाडी : 12     आजरा : 08
भुदरगड : 06       गडहिंग्लज : 01

Back to top button