पुणे: पुणे महानगरपालिकेने हडपसर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज सध्या बंद अवस्थेत असून, या रेंजची दुरवस्था झाल्याने हजारो होतकरू नेमबाज खेळाडूंचे भविष्य टांगणीला लागले आहे. ही रेंज तातडीने दुरुस्त करून सुरू करावी, अशी मागणी क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक व अध्यक्ष अमोल तुपे यांनी केली आहे.
बालेवाडीनंतर महाराष्ट्रातील मोठ्या शूटिंग रेंजपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रीडा संकुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून अंदाजे ४ ते ५ कोटी रुपये खर्च करून १० मीटर, २५ मीटर आणि ५० मीटर क्षमतेची आधुनिक शूटिंग रेंज उभारण्यात आली होती.
सुरुवातीच्या काळात या रेंजचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र, २०१९-२०२० मध्ये टेंडरची मुदत संपल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया रखडली आणि ही रेंज बंद पडली आहे. रेंज बंद असताना येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे मौल्यवान साहित्याची चोरी आणि नासधूस झाल्याचा आरोपही तुपे यांनी यावेळी केला.
या शूटिंग रेंजमध्ये पुणे शहरासह पूर्व हवेली आणि ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडू सराव करत होते. मात्र, रेंज बंद झाल्याने या खेळाडूंना सरावासाठी बालेवाडी येथे जावे लागत आहे.
एक ते दोन तासांचा प्रवास, वाढता आर्थिक खर्च आणि शाळा-महाविद्यालयांचे वेळापत्रक यामुळे अनेक खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेंजची तत्काळ दुरुस्ती, पारदर्शक पद्धतीने नवीन टेंडर प्रक्रिया, २४ तास सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती, आधुनिक इलेक्ट्रॉनिक टार्गेट सिस्टिम आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी तुपे यांनी केली आहे.