Hadapsar Traffic Congestion Pudhari
पुणे

Hadapsar Traffic Congestion: हडपसर माळवाडी रस्त्यावर वाहतूक कोंडी; शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे हाल

अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येमुळे माळवाडी परिसरात मोठी वाहतूक कोंडी; विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास सहन करावा लागला

पुढारी वृत्तसेवा

हडपसर: हडपसर-माळवाडी रस्त्यावर रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी वाहतूक कोंडी झाल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. विद्यार्थी आणि पालक वाहतूक कोंडीमध्ये बराच काळ अडकून पडल्याचे चित्र या वेळी दिसून आले. या रस्त्यावर अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर होत असून, याकडे महापालिका आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

माळवाडी रस्ता परिसरात साधना विद्यालय, एस. एम. जोशी महाविद्यालय, सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय, साने गुरुजी विद्यामंदिर, साधना कन्या शाळा आणि महापालिकेच्या शाळा आहेत. या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुमारे ३५ ते ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या रस्त्यावर व्यावसायिकांनी ठिकठिकाणी अतिक्रमणे केले आहेत. तसेच पदपथांवर टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. वाहनचालक वाटेल तेथे वाहनांचे पार्किंग करीत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होत आहे. यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

साधना शाळेसमोर दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करावी लागत आहे. स्कूल बस रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पथारी व्यावसायिक आणि हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. महापालिका प्रशासन या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांची कमतरता भात असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने छोट्या मुलांना रस्त्यावरून चालणेही अवघड होत आहे. परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त कुणाल धुमाळ म्हणाले की, हडपसर माळवाडी परिसरातील अतिक्रमणांवर नियमित कारवाई केली जाते आहे.

महापालिकेकडून नवीन पथारी व्यावसायिक आणि हातगाड्यांना परवाना देण्याची प्रक्रिया बंद आहे. मात्र, हडपसर परिसरात पथारी व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. प्रशासनाने माळवाडी रस्त्यावरील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी; अन्यथा अधिकाऱ्यांना घेराव घालून याबाबत प्रशासनाला जाब विचारला जाईल.
उल्हास तुपे, अध्यक्ष, राष्ट्रीय तालीम संघ
माळवाडी परिसरातील अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला कळविले आहे. तसेच शाळा भरताना आणि सुटताना या ठिकाणी वाहतूक पोलिस उपलब्ध असावा, यासाठी वाहतूक शाखेकडे पत्रव्यवहार केला आहे
प्रशांत तुपे, नगरसेवक
माळवाडी रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था असून, हजारो विद्यार्थी परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. परिसरातील वाहतुकीचे नियमन नियमितपणे केले जात आहे. तसेच शाळा भरताना आणि सुटताना एक वाहतूक पोलिस या भागात तैनात केला जात आहे.
राजेंद्र करनकोट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT