Groundnut Seed Pudhari
पुणे

Groundnut Seed Subsidy: तेलबिया अभियानांतर्गत भुईमूग बियाणे 100 टक्के अनुदानावर

पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत 2025-26 मध्ये एक हजार हेक्टरवर उन्हाळी भुईमूग लागवड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेलबिया घटकामध्ये सन 2025-26 अंतर्गत उन्हाळी भुईमुगाची एक हजार हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठीच्या प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा (भुईमूग शेंगा) शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर करण्यात येणार असून, ‌’प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य‌’ या तत्त्वावर त्याचे ऑनलाइनद्वारे सोडत पध्दतीने लवकरच वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत (एनएससी) भुईमूग बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असून, शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व ऑनलाइनवर अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अभियानांतर्गत पिकांची उत्पादकतावाढ व सुधारित भुईमूग वाणांच्या प्रसारासाठी उन्हाळी हंगामात भुईमूग बियाण्यांचे (5 वर्षांच्या आतील संशोधित वाण) 100 टक्के अनुदानावर वितरण केले जाणार आहे. प्रतिलाभार्थी शेतकऱ्यांस किमान 20 गुंठे ते कमाल एक हेक्टर मर्यादित भुईमूग बियाण्यांचे वितरण केले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांची ॲग््रािस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड ही लक्ष्यांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. उन्हाळी भुईमूग बियाणे लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर पुरवठा हा तालुका कृषी अधिकारी भोर, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, बारामती, पुरंदर व इंदापूर येथे तालुकास्तरावर करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या शीर्षकांतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमूग पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून 20 किलो व 30 किलोच्या पॅकिंगमध्ये भुईमूग बियाणे पुरवठा केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

केंद्रा सरकारचे खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेसाठी पाऊल

देशाचे खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये खाद्यतेलामध्ये देश आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठीचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

खेड तालुक्यात सर्वाधिक 200 हेक्टरचे लक्ष्यांक

तालुकानिहाय भुईमूग बियाणे लागवड (हेक्टरमध्ये) असून, करण्यात येणारा बियाणे पुरवठा क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. भोर 60 हेक्टर 90 क्विंटल यानुसार अन्य तालुक्यात खेड 200-300, आंबेगाव 120-180, जुन्नर 180-270, शिरूर 160-240, दौंड 45-67, बारामती 60-90, पुरंदर 55-83, इंदापूर 120 हेक्टरसाठी 180 क्विंटल भुईमूग बियाणे पुरवठा निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच, एक हजार हेक्टरवरील लागवडीसाठी 1500 क्विंटल भुईमूग बियाण्यांच्या पुरवठ्याचे नियोजन जिल्हास्तरावरून करण्यात आल्याचे काचोळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT