Groundnut Seed Pudhari
पुणे

Pune Groundnut Research Meeting ICAR: पुण्यात भुईमूग संशोधनाची राष्ट्रीय बैठक; एमपीकेव्ही व आयसीएआरचे संयुक्त आयोजन

21 ते 23 एप्रिलदरम्यान तीन दिवसीय परिषद; 150 हून अधिक शास्त्रज्ञांची उपस्थिती, नव्या वाणांवर व संशोधन दिशेवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि जुनागढ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) संयुक्त विद्यमाने येथील शासकीय कृषी महाविद्यालयात दि. 21 ते 23 एप्रिल या कालावधीत अखिल भारतीय समन्वित भुईमूग सुधार प्रकल्पाच्या तीन दिवसीय वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात दि. 21 एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे असून, अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (पीक शास्त्र) डॉ. डी. के. यादव उपस्थित राहणार आहेत.

तसेच, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक महासंचालक (तेलबिया व कडधान्ये) डॉ. संजीव गुप्ता आणि जुनागड येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे भारतीय भुईमूग संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. के. बेरा उपस्थित राहणार आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक तथा या कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ. प्रशांत बोडके आणि जळगाव येथील तेलबिया संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा कार्यक्रमाचे सह आयोजन सचिव डॉ. दीपक दहाट यांनी ही माहिती दिली आहे.

काय होणार चर्चा?

  • बैठकीत देशातील विविध 19 जिल्ह्यांतील 150 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांची उपस्थिती राहणार

  • प्रत्येक राज्यात सुरू असलेल्या भुईमूग पिकावरील संशोधनाचे सादरीकरण होणार

  • राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांसाठी नवीन शिफारशी, भुईमुगाचे प्रगत वाण प्रसारित करणार

  • इतर राज्यांतील भुईमूग पिकावर सुरू असलेल्या संशोधनाचे अदान-प्रदान

  • देशव्यापी भुईमूग पिकावरील पुढील वर्षाच्या संशोधनाची दिशा ठरण्यासाठी बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

राज्याचे खरीप हंगामातील पिकांखालील एकूण क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. त्यापैकी एकट्या सोयाबीन पिकाखालील क्षेत्र 50 लाख हेक्टर इतके झालेले आहे. तुलनेने अन्य तेलबीया पिकांखालील क्षेत्रात वाढ करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादकता असलेले भुईमुगाचे नवनवीन वाण उपलब्ध करून देण्यासाठी ही भुईमुगाची अखिल भारतीय वार्षिक बैठक महत्त्वाची ठरणार आहे. ज्याद्वारे पूर्वीप्रमाणेच भुईमूग पिकाखालील क्षेत्र वाढण्यासाठी सांघिक प्रयत्न करण्यात येत आहेत.
डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
SCROLL FOR NEXT