गणेश खळदकर
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी 2022-23 ते 2025-26 चा आढावा घेतला असता, गेल्या चार वर्षांत सरकारी शाळांमधील पहिलीची पटसंख्या तब्बल 1 लाख 37 हजार 606 विद्यार्थ्यांनी घटली असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.
त्यामुळे राज्य शासनाचा शाळा प्रवेशोत्सव उपक्रम सपशेल अपयशी ठरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिकचे संचालक शरद गोसावी आणि माध्यमिकचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी यंदाच्या शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यासंदर्भात शिक्षण विभागाला परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. या परिपत्रकातून हे वास्तव उघडकीस आले आहे.
गेली काही वर्षे सरकारी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे खासगी शाळांचे शुल्क परवडत नसतानाही पालक त्यांच्या मुलांचे खासगी शाळेत प्रवेश करत आहेत. मराठी माध्यमांच्या शाळांपेक्षा इंग््राजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा ओढा आहे. परिणामी, सरकारी शाळांमधील पटसंख्या दरवषी घसरत आहे.
प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांमध्ये पहिलीच्या पटात लक्षणीय वाढ व्हावी यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदा घटलेल्या पटसंख्येत काही प्रमाणात वाढ होणार की आणखी पटसंख्या घटणार, हे शाळा सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
पटसंख्या वाढविण्यासाठी हे उपाय करण्याचे निर्देश
शाळेच्या परिसरातील अंगणवाडी व बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील पहिलीमध्ये दाखल पात्र विद्यार्थी यादी घ्यावी.
शिक्षकांनी अंगणवाडी ताई व पालक यांना भेटून 100 टक्के विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका शाळेत दाखल व्हावेत, यासाठी प्रयत्न करावेत.
जिल्हा परिषद/ नगरपालिका/ महानगरपालिका शाळांमधील सोयी, सुविधा, शिष्यवृत्ती, विविध उपक्रम याबाबत पालकांना माहिती द्यावी.
समाजमाध्यमात प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद / नगरपालिका/महानगरपालिका शाळेत दाखल होतील, यासाठी प्रयत्न करावा.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही शाळा/शिक्षकांनी पहिलीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल व्हावेत यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करून समाज माध्यमावर प्रसिद्धी दिली आहे. याच धर्तीवर सर्व शाळांनी प्रचार प्रसिद्धी करावी. यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे व त्याबाबत सूचना द्याव्यात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशित व्हावेत, यासाठी शाळा भेटीच्या वेळेस लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग््राामपंचायत सदस्य, सरपंच, नागरिक यांच्याबरोबर चर्चा करावी.