Godhra Robbery Gang (File Photo)
पुणे

Godhra Robbery Gang: राजगुरूनगरमध्ये दरोड्याची तयारी फोडली! गोध्राच्या टोळीला बेड्या; टेम्पोत नक्की काय सापडलं?

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई—स्क्रू ड्रायव्हर ते धारदार चॉपरपर्यंत सर्व साहित्य जप्त; दोघे फरार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राजगुरूनगरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली गोध्रा (गुजरात) येथील दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्‍या. पोलिसांनी संशयास्पद टेम्पोसह तिघांना जेरबंद केले, तर दोघे यावेळी पळून गेले.

इरफान अब्दुलअमीद दुर्वेश (वय ४२), मोहम्मद अली हुसेन रेहमत (वय २१) आणि उमर फारूख अब्दुल सत्तार जाडी (वय ३६, रा. गोध्रा, गुजरात) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन २ डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास होलेवाडी येथे पोलिस पथकाला पुणे–नाशिक महामार्गावर एक टाटा टेम्पो संशयास्पदरीत्या उभा असल्याचे दिसून आले. तपासासाठी जवळ गेल्यावर टेम्पोत एकूण पाच जण दिसले. त्यांपैकी दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर तिघांना पोलिसांनी जागेवरच पकडले. टेम्पोची झडती घेतली असता स्क्रू ड्रायव्हर, गज, रॉड, कटावणी, लोखंडी धार असलेली पट्टी, कटर, धारदार चॉपर, बॅटरी इत्यादी दरोड्यात वापरले जाणारे साहित्य मिळून आले. या साहित्याबाबत त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

तपासात या टोळीचा मोठा गुन्हेगारी इतिहास समोर आला. गुजरातमधील पंचमहल जिल्हा तसेच महाराष्ट्रातील आळेफाटा, मंचर, सिन्नर इत्यादी ठिकाणी चोरी, दरोड्याच्‍या गुन्‍ह्यात त्‍यांचा सहभाग असल्‍याचे निष्पन्न झाले आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेने होलेवाडी परिसरात ही कारवाई केली. पुणे ग्रामीण अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

ट्रकमधील सव्वापाच लाखांचे टायर चोरीला

कोंढापुरीतील ट्रकमधून टायर चोरी केल्याचेही निष्पन्न तपासादरम्यान या आरोपींनी १४ नोव्हेंबरला शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोंढापुरी येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ ट्रकमधून सव्वापाच लाख रुपये किमतीचे टायर चोरी केल्याचे उघड झाले. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. दरोडा करण्याच्या तयारीत आढळल्यामुळे खेड पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश गरड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT