Friendship Pudhari
पुणे

Global Friendship Stories: ५० देशांच्या प्रवासातून जुळली ‘ग्लोबल मैत्री’; भारतीय संस्कृती आणि माणुसकीचा जगभर अनुभव

प्रमोद शेवडे, प्रशांत दामले आणि डॉ. दीपक शिकारपूर यांनी उलगडली सीमापार मैत्रीची कहाणी; तंत्रज्ञानामुळे नाती झाली अधिक घट्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: व्यवसायानिमित्त जवळपास ५० देश फिरलो... अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत... प्रत्येक देशात अनेक मित्र भेटले, मैत्रीचा धागा त्यांच्याशी दृढ झाला... पेरू, अर्जेंटिना अन्‌ ब्राझीलमधील मित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भारतीय माणसांविषयी असलेले प्रेम. तर अलास्का अन्‌ कॅनडामधील मित्रांमध्ये दिसली ती भारतीय संस्कृती विषयीची ओढ... व्हिएतनाम, बाली अन्‌ इंडोनेशियामध्येही प्रेम करणारी माणसं भेटली... तर चीनसारख्या देशातही भारतीय लोकांबद्दल खूप कुतूहल असलेली माणसं भेटली अन्‌ त्यांच्याशी मैत्रीचे बंध जुळले... सगळ्या देशांमधील मित्रांमधील एकच कॉमन धागा तो म्हणजे त्यांचे प्रेम अन्‌ माणुसकी... आजही तो धागा टिकून आहे अन्‌ या ग्लोबल मैत्रीने मला खूप काही दिले आहे, अशा शब्दांत पर्यटन व्यवसायात कार्यरत असलेले प्रमोद शेवडे यांनी त्यांच्या ग्लोबल मैत्रीची कहाणी सांगितली.

शेवडे यांची पर्यटन संस्था आहे. यानिमित्ताने त्यांनी विविध देशांच्या प्रवास केला आहे. गुरुवारी (दि. ३० जुलै) असलेल्या जागतिक मैत्री दिनानिमित्त दै. 'पुढारी'च्‍या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन्‌ अगदी आशिया खंडातील इंडोनेशियापासून ते व्हिएतनामपर्यंत त्यांनी भ्रमंती केली आहे. या प्रवासात त्यांना अनेक माणसे भेटली. काही स्थानिक, तर काही भारतीय... पण, त्यांचे अनेकांशी मैत्रीचे बंध जुळले आणि आजही ही मैत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आहे. प्रत्येक ठिकाणच्या माणसे वैशिष्ट्य अन्‌ भाषा, संस्कृती-परंपरा वेगळी आहे. पण, त्यांच्यातील मैत्रीचा बंध मन जिंकणारा असल्याचे शेवडे सांगतात.

शेवडे म्हणाले, प्रवास हा केवळ नवीन ठिकाणे पाहण्याचा अनुभव नसून, नवीन माणसे आणि नाती जोडण्याचा प्रवास आहे. अनेक देशांतील मित्रांचे स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाले आहेत. जगभरात मिळालेले हे मित्र म्हणजे आयुष्यभराची कमाई आहेत,’ असे शेवडे यांनी सांगितले.

फक्त शेवडेच नव्हे, तर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनीही जागतिक मैत्री दिनानिमित्त दै. 'पुढारी'शी साधलेल्या संवादात आपल्या ग्लोबल मैत्रीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

तंत्रज्ञानाने जोडलेली सीमापार मैत्री : डॉ. दीपक शिकारपूर

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज जगातील विविध देशांतील समान विचारांचे, समान ध्येय असलेले मित्र एका क्षणात जोडले जातात. माझ्या व्यावसायिक आयुष्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना आणि रोटरीच्या आंतरराष्ट्रीय सेवाकार्यात सहभागी होताना अमेरिकेतील, ऑस्ट्रेलियातील आणि युनायटेड किंग्डममधील मित्र लाभले. ज्ञानाची देवाणघेवाण, सामाजिक सेवा, तरुणांचे सक्षमीकरण, डिजिटल साक्षरता आणि नवतंत्रज्ञानाविषयीची समान आवड यामुळे ही मैत्री अधिक दृढ झाली. हजारो किलोमीटरचे अंतर असले तरी संवाद, विश्वास आणि सहकार्य यांमुळे ही नाती दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहेत, अशी भावना ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केली.

...अन्‌ जुळली सुंदर मैत्रीची नाती : प्रशांत दामले

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनीही आपल्या ग्लोबल मैत्रीचा प्रवास उलगडला. नाटकांच्या प्रयोगांसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांसह विविध देशांमध्ये केलेल्या दौऱ्यांमधून अनेकांशी मैत्रीचे नाते जोडले गेल्याचे दामले यांनी सांगितले. नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर माणसांना जोडणारा एक भावनिक पूल आहे. परदेशातील दौऱ्यांमध्ये कलाकार, आयोजक, रसिक आणि स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधताना अनेक सुंदर नाती निर्माण झाली. प्रत्येक देशातील दौऱ्यानंतर मित्रांचे स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाले आहेत. त्यामुळे या मित्रांशी संवाद होतो, असे दामले यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT