Wood, Coal Pudhari
पुणे

Pune Gas Shortage: गॅसटंचाईचा परिणाम; पुण्यात लाकूड-कोळशाची मागणी वाढली

हॉटेल व चहा विक्रेते पारंपरिक इंधनाकडे वळले; किमतीत वाढ, पुरवठ्यावर ताण

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: गॅसटंचाईमुळे इंधनाचा प्रश्न गंभीर बनला असून, त्याचा थेट परिणाम लाकूड आणि कोळशाच्या मागणीवर झाला आहे. हॉटेल व्यावसायिक, खाणावळचालक आणि चहा विक्रेत्यांनी व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे पारंपरिक चूल व शेगडीचा पर्याय निवडला आहे. सध्या काही हॉटेल व्यावसायिक 10 ते 20 किलो लाकूड खरेदी करताना दिसत आहेत, तर चहा विक्रेते 5 ते 10 किलो कोळसा घेऊन जात आहेत. त्यामुळे शहरात लाकूड आणि कोळशाची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. मात्र, दुसरीकडे शहर आणि उपनगरांतील वखारींची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.

पूर्वी पुण्यात मोठ्या प्रमाणात वखारी कार्यरत होत्या. मात्र वाढते शहरीकरण, गॅसचा वाढलेला वापर, फ्लॅट संस्कृती आणि व्यवसायात पुढील पिढी न येणे यांसारख्या विविध कारणांमुळे या वखारींची संख्या घटत गेली. सध्या शहरात केवळ 70 च्या आसपास वखारी उरल्या आहेत. यामुळे अचानक वाढलेल्या मागणीसमोर पुरवठा अपुरा पडत आहे. कसबा पेठ, सदाशिव पेठ, भवानी पेठ, कॅम्प, बिबवेवाडी आदी भागांमध्ये अजूनही काही वखारी सुरू आहेत. या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात व्यावसायिक लाकूड आणि कोळसा खरेदीसाठी येत आहेत. मात्र, मर्यादित साठ्यामुळे वखार चालकांना देखील हॉटेल व्यावसायिकांना आणि चहा विक्रेत्यांना मर्यादित प्रमाणातच लाकूड आणि कोळसा द्यावा लागत आहे.

कसबा पेठेतील वखार व्यावसायिक सुरेश शेरे म्हणाले, “गेल्या 50 वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. सध्या गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक, खानावळ मालक आणि चहा विक्रेत्यांकडून लाकडाची मागणी लक्षणीय वाढली आहे. रोज 30 ते 35 व्यावसायिक लाकूड खरेदीसाठी येत आहेत. मात्र, आम्हालाच लाकूड आणि कोळसा मर्यादित प्रमाणात मिळत असल्याने त्यांचा ठराविक प्रमाणातच पुरवठा करावा लागत आहे. खानावळ चालकांना साधारण 10 ते 12 किलो, तर हॉटेल व्यावसायिकांना 20 ते 25 किलो लाकूड देण्यात येत आहे.”

लाकूड अन्‌‍ कोळशाच्या किमतीत वाढ

लाकूड आणि कोळशाच्या किमतीतही वाढ झाली असून, सध्या दर प्रतिकिलो 35 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागणी वाढल्यामुळे दरात 5 टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. रोज 35 ते 40 हॉटेल व्यावसायिक खरेदीसाठी येत असल्याने वखारींवर ताण वाढत आहे.

गेल्या काही वर्षांत लाकूड आणि कोळशाची मागणी कमी झाल्याने अनेक वखारी बंद पडल्या. आता 70च्या आसपास वखारी पुण्यात आहेत. गॅसटंचाईमुळे अचानक लाकूड आणि कोळशाची मागणी 10 ते 20 टक्क्यांनी वाढली असून, लाकूड आणि कोळशाच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे
महेंद्र शिर्के, अध्यक्ष, शिवशंभो असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT