अशोक मोराळे
पुणे : गजानन आणि दीपा दोघे एकमेकांच्या परिचयाचे… पूजाअर्चा करून दोघे उदरनिर्वाह करत होते. गजानन दीपापेक्षा आता मोठा होत चालला होता. त्यांच्या गुरूनेदेखील त्याच्यावर मेहरनजर केली होती. त्यामुळे त्याच्या दरबारात मोठी रांग लागायची. दिवसेंदिवस तो आर्थिक सुबत्तेबरोबर पंथात मानपानाने मोठा होत होता, तर दुसरीकडे दीपाचा रुतबा कमी होत चालल्यामुळे ती बेचैन झाली होती. त्यामुळे तिने शांत डोक्याने गजाननचा काटा काढण्याचा डाव रचला…. एवढेच नाही, तर 20 लाखांना सुपारी देऊन त्याचा 'गेम'ही केला.
पूजा-अर्चेतील वर्चस्ववाद आणि त्यातील अर्थकारणातून सुपारी देऊन गजानन हवा याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासातून समोर आला आहे. त्यातील पाच लाख रुपये आरोपींना देण्यात आले आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत दीपा आण्णाप्पा राजमाने (वय 31, रा. संभानगर, कर्वेनगर), सौरभ रोशन आमले (वय 22, रा. मावळेआळी कर्वेनगर), गणेश अंकुश वांजळे (वय 39, रा. देशमुखवाडी, शिवणे) या तिघांना अटक केली आहे, तर सोमेश बजरंग चव्हाण (रा. हॅपी कॉलनी, कर्वेनगर) हा अद्याप फरारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातून गजाननचे 18 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने अपहरण करून ताम्हिणी घाट परिसरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. अपहरणाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करून पोलिसांनी गाडीतील दोन रक्ताच्या डागावरून त्याच्या खुनाचा छडा लावला. सुरुवातीला आमले, वांजळे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दीपाचे नाव समोर आले. आमलेने दीपाने गजाननच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलिसांना सांगितले.
चौकशीसाठी तिला ताब्यात घेतले, त्यावेळी तिने 20 लाख रुपयांना खुनाची सुपारी दिल्याची कबुली दिली. गजानन, सोमेश चव्हाण, दीपा, वांजळे व आमले हे सर्व एकमेकांच्या परिचयातील आहेत. चव्हाणने गजाननकडून काही दिवसांपूर्वी 50 हजार रुपये घेतले होते. त्यातून त्यांचा वाद झाला होता. याचादेखील चव्हाणच्या डोक्यात राग होता, तर दुसरीकडे तो मोठा होत चालल्यामुळे दीपाचासुद्धा त्याच्यावर राग होता. आमले हा दीपा हिचा खास, तर चव्हाण हा गजाननचा खास होता.
मात्र, वाद झाल्यामुळे चव्हाण दूर गेला होता. त्यातूनच दीपाने चव्हाण आणि आमले या दोघांना गजाननच्या खुनाची 20 लाखाला सुपारी दिली. त्यातील 5 लाख रुपये दोघांना 17 मे रोजी रोख दिले. त्यातील दहा हजार रुपये आमले याला चव्हाण याने दिले, तर बाकीचे पैसे तो घेऊन गेला. ठरल्याप्रमाणे गजानन याच्या खुनाची योजना आखून त्याचा शांत डोक्याने गोळी झाडून काटा काढला. त्याचा मृतदेह नांदेवली गावच्या हद्दीतील एका खड्ड्यात पुरून टाकण्यात आला होता. गजानन बेपत्ता झाल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांना काहीतरी काळंबेरं झाल्याचा संशय आला.
तेथूनच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके, उपनिरीक्षक स्नेहल जाधव, अमोल सावंत, कर्मचारी गोविंद फड, बाळू शिरसाट, अमोल काटकर, अमोल राऊत यांच्या पथकाने सुतावरून स्वर्ग गाठून आरोपींना बेड्या ठोकल्या. आतापर्यंत याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, तर चव्हाण हा अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.