Admission Pudhari
पुणे

FYJC Admission 2nd Round: अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी आज संपणार; १३ जूनला गुणवत्ता यादी जाहीर

FYJC केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नोंदणी, दुरुस्ती व पसंतीक्रम भरण्याची आज अंतिम संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील नियमित दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना ६ ते ९ जून या कालावधीत नव्याने नोंदणी, अर्जातील दुरुस्ती, तसेच पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार आज दि.९ रोजी विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेशाची शेवटची संधी असून, येत्या १३ जूनला संबंधित फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील ९ हजार ५९४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या नियमित फेरीत ४ लाख ५१ हजार ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पर्याय निवडणे आवश्यक आहे.

सर्व फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज 'अनलॉक' केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन लॉक करणे अनिवार्य आहे. दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात येणार आहेत, असे स्पष्ट केले आहे. दुसऱ्या फेरीसाठी आत्तापर्यंत ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नव्याने नोंदणी केली आहे.

दुसऱ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया झाल्यानंतर १८ जून रोजी तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून, १९ जून रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लक्षात घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. अधिकृत माहितीसाठी संकेतस्थळ तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असे आहे दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक

  • अर्ज नोंदणी, दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे - ६ ते ९ जून

  • दुसऱ्या फेरीची निवडयादी जाहीर - १३ जून

  • महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे - १३ ते १६ जून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT