पुणे

Pune crime news : मदनवाडीमध्ये दोन गटात फ्रि-स्टाईल

अमृता चौगुले

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : मदनवाडी येथे शनिवारी (दि. 21) दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले. या हाणामारीत रिव्हॉल्व्हर, कुर्‍हाड, कोयता, दांडके याचा सर्रासपणे वापर झाला. याप्रकरणी दोन्ही गटाच्या 12 जणांविरुद्ध भिगवण पोलिसात सोमवारी (दि. 23) गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रिव्हॉल्व्हर, कुर्‍हाड, कोयता, दांडके याचा सर्रासपणे वापर

याबाबत भिगवण पोलिसांनी माहिती दिली की, दोन्ही गटातील आरोपी विरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, बेकायदेशीर जमाव जमवणे,अवैध शस्त्र बाळगणे आदी कलमानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहाजी विजय देवकाते (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय देवकाते, शुभम देवकाते, अक्षय देवकाते, किरण देवकाते, राहुल ठवरे, किरण ठवरे (सर्व रा. देवकाते वस्ती मदनवाडी, ता. इंदापूर) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यांच्या फिर्यादीनुसार आरोपींनी देवकाते वस्ती रस्त्यावर बोलोरो क्विड व विंटो मोटारीतून येऊन रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळी झाडून तुझ्या जागेवर आम्ही ताबा मारणार आहे, असे म्हणून हातातील लोखंडी कोयता डोक्यावर मारला व फिर्यादीस सोडण्यास आलेल्या व्यक्तींनाही जखमी करून सर्वजण निघून गेले.

संजय पांडुरंग देवकाते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय देवकाते, शिवाजी देवकाते, आकाश ऊर्फ शुभम देवकाते, शहाजी देवकाते, लक्ष्मण बंडगर आणि दीपक साळुंखे (सर्व रा. मदनवाडी, ता. इंदापूर) यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी जीवे मारण्याचे उद्देशाने कुर्‍हाड, कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केलेे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT