पुणे

Fraud Case : आकर्षक परताव्याचा बहाणा करुन 27 लाखांची फसवणूक

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तिघांना 26 लाख 87 हजार 381 रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी खडक आणि कोंढवा पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खडकमधील 34 वर्षीय तरुणीला सायबर ठगांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने 21 लाख 56 हजार 381 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तरुणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर ठगांनी तिला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधून एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले.

तरुणी प्रलोभनाला बळी पडली आणि तिने सायबर ठगांच्या हवाली पैसे केले. त्यानंतर तिला ना गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळाली ना नफा. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड करत आहेत. कोंढवा खुर्दमधील एका 42 वर्षीय व्यक्तीलादेखील अशाच प्रकारे ठगांनी गंडा घातला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क केल्यानंतर ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. पुढे शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांतील शेअर खरेदी-विक्री करण्याच्या बहाण्याने त्यांना काही मोबदला देण्यात आला. मोबदला मिळताच फिर्यादी अलगद सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले. आमिषाला बळी पडत त्यांनी 4 लाख 4 हजार रुपये सायबर चोरट्यांना दिले. मात्र, त्यांनादेखील परतावा मिळाला नाही, ना मूळ रक्कम. शिवनेरीनगर कोंढवा येथील 26 वर्षीय तरुणीला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचे प्रलोभन दाखवून 1 लाख 27 हजार रुपये उकळले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT