रेल्वेच्या पुणे विभागात ’महिलाराज’..! | पुढारी

रेल्वेच्या पुणे विभागात ’महिलाराज’..!

प्रसाद जगताप

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागात आता महिलाराज सुरू झाले असून, आता विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे  आणि विभागीय वरिष्ठ रेल्वे सुरक्षा  आयुक्त प्रियंका शर्मा यांच्या हाती सूत्रे  राहणार आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाच्या कारभाराची जबाबदारी आता या दोन महिला अधिकार्‍यांकडे आली आहे. एक वरिष्ठ महिला अधिकारी  रेल्वेच्या पुणे विभागाचा प्रशासकीय कारभार सांभाळत आहे, तर दुसरी महिला अधिकारी रेल्वे पुणे विभागाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे आता पुणे विभागाचा कारभार पारदर्शी आणि स्वच्छ असेल, अशी अपेक्षा अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

इंदू दुबे यांच्याविषयी

काही महिन्यांपूर्वी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पदाचा पदभार इंदू दुबे यांनी स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर पुणे विभागात रखडलेले विद्युतीकरणाचे काम त्यांनी पूर्ण केले. दुहेरीकरणाची कामेदेखील वेगाने सुरू केली. त्यांच्याच काळात विभागातील काही स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे आता जोराने सुरू आहेत. हडपसर टर्मिनलचे उर्वरित कामे पूर्ण करून, ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे त्यांच्याकडून नियोजन आहे. दुबे या भारतीय रेल्वे वाहतूक सेवेच्या (आयआरटीएस) 1994 बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी अर्थशास्त्र आणि विधि यांत पदवी शिक्षण घेतले आहे. याआधी त्या लखनौ येथे चीफ कमिशनर रेल्वे सेफ्टी यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी सेफ्टी/वाहतूक म्हणून कार्यरत होत्या. दुबे यांनी रेल्वे सेवेदरम्यान लखनौ, इज्जतनगर, वाराणसी, सोनपूर विभागांमध्ये आणि उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय असलेल्या गोरखपूर येथे परिचालन आणि वाणिज्य विभागात विविध पदांवर काम केले आहे.

प्रियंका शर्मा यांच्याविषयी

प्रियांका शर्मा यांनी नुकताच पुणे विभागात वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (आरपीएफ) म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्या उत्तर रेल्वे दिल्ली येथे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त या पदावर कार्यरत होत्या. शर्मा या भारतीय रेल्वे सुरक्षा दल सेवेच्या 2012 तुकडीच्या अधिकारी आहेत. त्यांनी सार्वजनिक प्रशासन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांना भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा विभागात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी बिकानेर विभागातून सहायक सुरक्षा आयुक्त म्हणून आपली सेवा सुरू केली होती. आता त्या पुणे विभागात वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.  त्यांच्यावर आता अतिशय संवेदनशील असलेल्या पुणे विभागातील इतर स्थानकांसह पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी असणार आहे.

आता ही आहेत आव्हाने…

  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे रेल्वे स्थानकावर ‘सुरक्षा कवच’ निर्माण करणे
  • अनधिकृत विक्रेत्यांना रोखणे
  • फुकट्या प्रवाशांना रोखणे
  • रेल्वेगाड्यांमध्ये होणार्‍या चोर्‍या, गांज्यासह अन्य पदार्थांची होणारी स्मगलिंग थांबविणे
  • प्रवाशांकरिता गाड्या वाढवून वेळेत सेवा पुरवणे
  • पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी रोखणे
  • विविध उपक्रम राबवून उत्पन्नात वाढ करणे
  • प्रवाशांना पायाभूत सुविधा उपलब्ध करणे
  • पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि यार्डाचे रिमॉडलिंगचे काम पूर्ण करणे
  • पुणे-मिरज दुहेरीकरण काम पूर्ण करणे
  • रेल्वे गाड्यांचे अपघात आणि गाड्यांमधील आगीच्या घटना रोखणे
  • प्रवाशांना तिकिटासाठी येणारे वेटिंग कमी करून अनधिकृत एजंटांना रोखणे

हेही वाचा

Back to top button