पुणे

बारामती : भांडगावमधील युवकाच्या खूनप्रकरणी चौघांना सक्तमजुरी

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

नदीमध्ये पोहताना अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून युवकाचा खून केल्याच्या खटल्यात बारामतीचे जिल्हा सत्र न्यायाधिश शेख यांनी दौंड तालुक्यातील भांडगाव येथील चौघांना सहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

राजेंद्र भगवान मोडक, सतीश विष्णू नागवडे, जालिंदर उर्फ आण्णा येळवंडे आणि विजय सावळा तांबे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात श्रीनाथ विजय लेंडगे (वय १८) याचा २२ मार्च २०११ रोजी खून झाला होता. याप्रकरणी त्याची मामी मनिषा महेंद्र नागवडे पाटील (रा. भांडगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली होती.

यात्रेमध्ये घडला होता प्रकार

भांडगावच्या खंबेश्वराची यात्रा २० मार्च २०११ रोजी सुरु झाली होती. त्यासाठी फिर्यादीचा भाचा श्रीनाथ हा त्यांच्याकडे आला होता. दि. २२ मार्च २०११ रोजी श्रीनाथ हा फिर्यादीच्या मुलांसह भीमा नदीवर पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पोहत असताना सतीश विष्णू नागवडे याच्या अंगावर पाणी उडाले होते. त्यातून त्यांची भांडणे झाली होती. ही घटना श्रीनाथ व फिर्य़ादीच्या मुलाने फिर्यादीला सांगितली. परंतु फिर्यादीचे पती घरी नसल्याने त्यांनी कोणतीही तक्रार दिलेली नव्हती. त्याच दिवशी संध्याकाळी साडे सात वाजता आरोपींनी फिर्यादीच्या घरी येत शिविगाळ केली. फिर्यादीसह त्यांची मुले अक्षय, आकाश, मयत श्रीनाथ यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. त्यात श्रीनाथ हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असताना २२ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मनिषा नागवडे पाटील यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती. त्यानुसार सातजणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी या घटनेचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड. प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. तसेच या खटल्यात न्यायवैद्यकिय पुरावा महत्त्वाचा ठरला. ऍड. जोशी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून भादंवि कलम ३०४ नुसार चौघांना सहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. अन्य तिघांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. यवतचे सहाय्यक फौजदार एन. ए. नलवडे, पोलिस नाईक व्ही. टी. ढोपरे यांनी या कामी सरकार पक्षाला मदत केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT