पुणे : अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर फिरवला रोटोवेटर | पुढारी

पुणे : अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर फिरवला रोटोवेटर

कडूस ; पुढारी वृत्तसेवा

दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याचे पीक अक्षरशः वाया गेले असून, कङूस परिसरातील शेतकरी बांधवांनी कांदा पिकावर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला आहे.

 शेतकरी बांधवांनी रोटाव्हेटर फिरवला

एकीकडे कांद्याला मिळणाऱ्या उच्‍चांकी दराच्या कथा मांडल्या जात असतानाच दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने पिकांवर करपा रोगाचा प्रादूर्भाव होऊन पिवळ्या पडलेल्या, करचळलेल्या व पाण्यामुळे मुळ्या कुजलेल्या कांदा पिकावर शेतकरी दत्ताञय ज्ञानेश्वर बंदावणे, विशाल बंदावणे, दिनेश बंदावणे, सुखदेव बंदावणे आदींसह शेतकरी बांधवांनी रोटाव्हेटर फिरवला.

करपा रोगाच्या प्रादुर्भावासह पिवळ्या पडलेल्या, करचळलेल्या व पाण्यामुळे मुळ्या कुजलेल्या कांदा पिकावर अनेक शेतकऱ्यांनी रोटर फिरवला आहे. उत्पन्नात घट होण्यापेक्षा आताच पीक शेतातून काढून फेकून देत शेत दुसऱ्या पिकासाठी तयार करणे शेतकऱ्यांनी पसंत केले आहे.

कांदा पिकाचे आगार म्हणून कङूसची ओळख

कांदा पिकाचे आगार म्हणून कङूसची ओळख असून बहुतांश शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत कांदा पिकावर अवलंबून आहे. मात्र, यावर्षी रब्बी हंगामातील लागवडीच्या ऐन मध्यावर अवकाळी पावसाने पिकांना झोडपले. त्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. अगोदरच्या सतत ढगाळ वातावरण व धुक्यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यातच अवकाळी पावसाने झोडपले. पाऊस, धुके व ढगाळ वातावरणामुळे एक ते दोन महिन्याचे पीके पिवळी पडली. नुकतीच लागवड केलेली पिके भुईसपाट झाली. कांदा पातींना पीळ पडला. पिकावर करपा वाढला. रोगामुळे पीक हाताबाहेर गेले. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला.

पावसाचे पाणी साठल्यामुळे अनेक ठिकाणी पीक जमिनीतच सडले. अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक जमिनीतच पन्नास टक्क्यांपर्यंत सडल्याचे दिसून येत आहे. पीक जाग्यावर करपून गेल्याने शेतात विरळ पीक शिल्लक राहिले. महागडी रोपे, खते, औषधे, मशागतीसह लागवड व अन्य कामाची मजुरी, कुटुंबाची मेहनत, त्यात लपंडाव करणारी व अव्वाच्या सव्वा बिल येणारी वीज याचा खर्च तर वेगळाच.

पिकावर आतापर्यंत करावा लागलेला खर्च पाण्यात

पिकावर आतापर्यंत करावा लागलेला खर्च पाण्यात गेला आहे. आता उरलेले पीक जोपासले तरी मिळणाऱ्या उत्पन्नातून मजुरीदेखील वसूल होणार नाही, अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांनी पीक शेतातून काढून टाकण्याच्या हेतूने पिकावर ट्रॅक्टरचा रोटर फिरवला आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,’ अशी मागणी कङूस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन पंडित मोढवे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी राब राब राबणं शेतकर्यांच्या हातात आहे. बाकी, त्यांला मिळणारी हवामान अन् पाऊस पाण्याची साथ, बाजारातील दर हे सारं काही परस्वाधीन आहे. यामुळेच हा कांदा, कधी उत्पादकांना रडवतो तर कधी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करतो, असा आजवरचा अनुभव असल्याचे शेतकरी कृषी सेवा केंद्राचे नितिन पटने यांनी सांगितले.

Back to top button