Candidate Pudhari
पुणे

Pune Former Opposition Leaders: पुण्यात माजी विरोधी पक्षनेते एकत्र; शहरातील प्रलंबित प्रश्नांसाठी स्वतंत्र संघटना स्थापन

विकास प्रकल्प, वाहतूक, पाणीपुरवठा आणि नागरी समस्यांवर शासन-प्रशासनाकडे संयुक्त पाठपुरावा करण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रशासनाच्या काळात रखडलेले विकास प्रकल्प, बदललेले महापालिका सभागृहाचे स्वरूप आणि शहरातील वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या प्रश्नांसाठी आता महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते एकत्र आले आहेत. विविध राजकीय पक्षांचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलेल्या सर्वपक्षीय नेत्यांची स्वतंत्र संघटना स्थापन करण्यात आली असून, शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून शासन, प्रशासन आणि महापालिका सभागृहाच्या निदर्शनास ते आणले जाणार असल्याची माहिती महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार चेतन तुपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी विद्यमान विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, ॲड. अविनाश साळवे, सुहास कुलकर्णी, उज्ज्वल केसकर, आबा बागुल, वसंत मोरे आणि दीपाली धुमाळ उपस्थित होत्या. चेतन तुपे म्हणाले, सध्या महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेतेपद भूषविलेल्या ३१ जणांपैकी सर्व जण हयात आहेत. शहराच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याबाबत सर्वांशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

प्रत्येकाने आपल्या कार्यकाळात शहरातील विविध प्रश्न मांडण्याचा आणि प्रशासनातील त्रुटी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रश्न तत्काळ मार्गी लागणे शक्य नसते. अनेक विषयांचा पाठपुरावा सातत्याने केल्यानंतरच त्यांना गती मिळते, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, प्रशासकीय कारभाराच्या काळात शहरातील अनेक प्रश्नांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. नव्या महापालिका सभागृहात प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव मिळण्यासाठी आणि शहराच्या दैनंदिन प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी अनुभवी माजी विरोधी पक्षनेत्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. लवकरच सर्व माजी विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त बैठक घेऊन शहरातील प्राधान्याच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असून, त्यानुसार संघटनेची पुढील दिशा आणि कृती आराखडा निश्चित केला जाणार असल्याचे आमदार तुपे यांनी सांगितले.

शहराच्या विकासासाठी त्यांचा अनुभव महत्त्वाचा

शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, नागरी सुविधा आणि विकासकामांशी संबंधित प्रश्नांवर शासन, प्रशासन तसेच नव्या नगरसेवकांकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. विविध राजकीय पक्षांतील माजी विरोधी पक्षनेत्यांचा अनुभव शहराच्या विकासासाठी आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपयोगात आणला जाणार असल्याचेही तुपे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT