Book  Pudhari
पुणे

Folk Literature Committee: लोकसाहित्य समिती अस्तित्वात, पण काम ठप्प; निधी असूनही प्रकल्प रखडले

तीन पुस्तक प्रकल्पांना निधी मंजूर होऊनही वर्षभर बैठक नाही; पुण्यात कार्यालयाचाही अभाव

पुढारी वृत्तसेवा

पुणे : लोकसाहित्याशी संबंधित तीन पुस्तकांच्या प्रकल्पाला निधी मंजूर झाल्यावरही प्रकल्पाच्या कामाला गती न मिळणे, समिती सदस्यांना बैठक घेण्यासाठी जागा उपलब्ध नसणे अन् वर्षभरापासून समितीची बैठक न होणे, अशा पद्धतीने लोकसाहित्य समितीच्या कामांना मिळेना गती, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. समिती स्थापन झाली खरी, पण सरकारचे लक्ष समितीकडे आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या वर्षभरापासून समितीची प्रकल्प आणि कामकाजाच्या नियोजनासाठीची बैठक झालेली नाही, त्यामुळे नियोजित प्रकल्पांना गती मिळालेली नाही आणि नवीन प्रकल्पांवर चर्चाही झालेली नाही. समितीकडून बैठक आयोजित करण्यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. लोकसाहित्याचे संशोधन, जतन करण्यासह लोकसाहित्याचा प्रसार करणे या उद्देशाने लोकसाहित्य समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर 2023 मध्ये समितीचे पुनर्गठन करण्यात आले.

समिती पुनर्गठीत झाल्यानंतर समितीचे कामकाज सुरूही झाले. ही समिती उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येते. पण, दोन वर्षे उलटूनही समितीचा एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. बैठक न झाल्यामुळे नव्या प्रकल्पांबद्दलची चर्चाही रखडली असून, त्यात गेल्या दोन वर्षांपासून वारंवार मागणी करूनही समितीला अजून पुण्यात स्वतःचे कार्यालय मिळालेले नाही, त्यामुळे आम्ही बैठक कुठे घ्यावी? हा प्रश्नसुद्धा समिती सदस्यांसमोर आहे. लोकसाहित्यासाठी काम करणाऱ्या समितीच्या कामकाजाकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

तीन प्रकल्पांना निधी मंजूर, पण गती मिळेना

तीन पुस्तकांच्या प्रकल्पांना साधारणपणे वर्षभरापूर्वी निधी मंजूर झाला. पण या प्रकल्पांना गती मिळालेली नाही. त्याशिवाय नव्या प्रकल्पांवर आणि समितीच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठीची नियोजन बैठकही वर्षभरापासून झालेली नाही. याचे कारण म्हणजे बैठकीसाठी सरकारकडून मंजुरी न मिळणे, बैठकीसाठी जागा उपलब्ध नसणे हे आहे.

लोकसाहित्य समितीला पुण्यात कार्यालय मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. गेल्या वर्षभरापासून समितीची बैठक झालेली नाही. बैठकीला विभागातील अधिकारी, समितीतील सरकारी समन्वयकही उपस्थित असतात. त्यामुळे बैठक म्हणजे सरकार आणि समिती सदस्यातील समन्वय साधण्यासाठीचा दुवा आहे. परंतु बैठकीअभावी नवीन प्रकल्पांवर आणि समितीच्या कामाबाबत चर्चा झालेली नाही. बैठकीसाठी आम्ही उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहोत आणि त्यासंबंधीचे पत्रही दिले आहे. लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी.
शाहीर हेमंतराजे मावळे, अध्यक्ष, लोकसाहित्य समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT