पुणे : देशातील पहिली सोडियम बॅटरी पुण्यात तयार झाली असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ही बॅटरी एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया)च्या वतीने आयोजित प्रदर्शनात प्रथमच प्रदर्शित करण्यात आली. त्यामुळे लवकरच दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी ती बाजारात येऊ शकेल.
भारतात अशा प्रकारची बॅटरी पहिल्यांदाच तयार करण्यात आली आहे. या संशोधनाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करीत असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)ने मान्यता दिली आहे. ही संस्था देशातील वाहन उद्योगाची प्रमाणन, संशोधन व विकास संस्था आहे. ही बॅटरी एआरएआयच्या वतीने मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे आयोजित केलेल्या ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.
पुढील आठ ते नऊ महिन्यांत ही बॅटरी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार असल्याची माहिती बॅटरी विकसित करणाऱ्या रिचार्जियन एनर्जी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. विलास शेळके यांनी दिली. ही कंपनी पाषाण येथील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रासायनिक संस्थेच्या (एनसीएल) इनोव्हेशन पार्कमध्ये कार्यरत आहे.
एआरएआयच्या ‘टेक्नोव्हस’ या खास वाहन उद्योगातील स्टार्टअपसाठी असलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून रिचार्जियन एनर्जी या कंपनीला लिथियम बॅटरीला पर्याय म्हणून सोडियम आयन बॅटरी तयार करण्यासाठी सुरुवातीला आवश्यक मदत व काही निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय, इंडो-यूएस प्रोग््रााम आणि युनायटेड नेशन यांच्याकडून ही बॅटरी विकसित करण्यासाठी सुमारे 4 कोटी रुपये इतका संशोधन व विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले.
भारतात सोडियमचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सोडियम हे समुद्राच्या पाण्यातून मिळते. ही बॅटरी तयार करण्यासाठी शेतातील टाकाऊ माल (ॲग््राी वेस्ट) वापर करण्यात येतो. लिथियम बॅटरी तयार करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी विदेशातून मागवाव्या लागतात. मात्र, सोडियम आयन बॅटरीच्या निर्मितीची प्रक्रिया भारतातच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या बॅटरीला आग लागत नाही. याची चाचणी एआरएआयने 120 अंश सेल्सिअस तापमानावर केली आहे, त्यामध्ये ही बॅटरी यशस्वी झाली आहे.डॉ. विलास शेळके, संशोधक
सोडियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरता येणे शक्य असून, तिच्या चार्जिंगसाठी 30 मिनिटांचा अवधी लागतो. एकदा बसवलेल्या या बॅटरीची लाइफ लिथियम बॅटरीच्या तीनपट म्हणजे 22 वर्षांपर्यंत असेल. किंमत सध्या वापरात असलेल्या लिथियम बॅटरीपेक्षा 25 ते 30 टक्के कमी असेल.
पुढील आठ ते नऊ महिन्यांत ही बॅटरी इलेक्ट्रिक गाड्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात दुचाकी, दुसऱ्या टप्प्यात तीनचाकी आणि तिसऱ्या टप्प्यात चारचाकी वाहनांसाठी ही बॅटरी उपलब्ध करून देण्यात येईल. नजीकच्या काळात निर्मिती करण्यासाठी पुण्यामध्ये कारखाना सुरू करण्याची योजना असून, त्यासाठी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. आवश्यक गुंतवणूक उभी करण्यासाठी काही गुंतवणूकदारांची चर्चा सुरू.