

पुणे : मैत्रिणीसोबत झालेल्या वादातून लोणावळा येथे गोळीबार करणाऱ्या राहुल तारूवर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्याविरुद्ध चार गुन्ह्यांची नोंद असताना देखील शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटा पत्ता, बनावट भाडेकरार (रेंट ॲग््राीमेंट) आणि चुकीचे शपथपत्र सादर करून शासन व पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी भूषण उर्फ राहुल रामचंद्र तारू याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 4 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे पोलिस आयुक्तालयात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अर्जासोबत त्याने आपण लोणी काळभोर परिसरातील स्वप्नशील सोसायटीमध्ये भाड्याने राहत असल्याचे दाखवले होते.
यासाठी त्याने भाडेकरार, शपथपत्र तसेच इतर कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांमध्ये त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी खटला दाखल नसल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिस तपासात आरोपी कधीही स्वप्नशील सोसायटीमध्ये वास्तव्यास नसल्याचे उघड झाले.
पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केलेल्या चौकशीत आरोपीने शस्त्र परवाना मिळवण्याच्या उद्देशाने खोटा भाडेकरार तयार करून जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने शस्त्र परवाना मिळवला होता.
विशेष म्हणजे, आरोपी भूषण उर्फ राहुल तारू याच्याविरोधात यापूर्वी पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सहकारनगर पोलिस ठाण्यात 2000, 2006 आणि 2011 मध्ये, तसेच बंडगार्डन पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. मात्र, ही माहिती आरोपीने अर्ज करताना जाणूनबुजून लपवली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शस्त्र परवाना अर्ज करताना अर्जदाराने आपला खरा पत्ता आणि संपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे बंधनकारक असते. मात्र, आरोपीने खोटा पत्ता दिला, बनावट कागदपत्रांचा वापर केला आणि आपला गुन्हेगारी इतिहास लपवून शासन व पोलिसांची फसवणूक केली. याप्रकरणी भूषण तारूच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 181, 420, 465 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.