Fertilizer Pudhari
पुणे

Fertilizer Black Marketing: खतांच्या काळाबाजारावर कृषी विभागाचा दणका; 107 परवाने निलंबित, 6 रद्द

पुणे विभागात २,५७६ खत विक्री केंद्रांची तपासणी; २८१ प्रकरणांत अनियमितता, ७ केंद्रांवर गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्राची कडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित आणि ६ खत विक्री परवाने रद्द, तर ७ केंद्रावर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पुणे विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.

या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्राची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान २८१ प्रकरणांमध्ये काळाबाजार झाल्याचे समोर आले असून, २७७ केंद्राना 'कारणे दाखवा नोटीस' बजाविण्यात आली आहे.

अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रातूनच खत खरेदी करावे आणि काही तक्रार आल्यास नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील ६५० केंद्राची तपासणी केली असता ७१ प्रकरणांत अनियमितता आढळली असून, २७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्राची तपासणीनंतर १६ खत विक्री परवाने निलंबित आणि २ खत विक्री परवाने रद्द करून ३ केंद्रावर गुन्हे दाखल करण्यात आले. तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्राची तपासणी करण्यात आली. १८ प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण ६४ परवाने निलंबित आणि ४ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले तर ४ केंद्रावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.

युरियासंदर्भात ४२ औद्योगिक युनिट्सना भेटी

अनुदानित युरियाचा औद्योगिक कारणांसाठी वापर टाळण्यासाठी विभागात ४२ औद्योगिक युनिट्सना भेटी देण्यात आल्या आहेत. कृषी विभागातर्फे खतांचा काळाबाजार, कृत्रिमटंचाई, साठेबाजी आणि चढ्यादराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जेजुरकर यांनी दिला आहे. कारवाईच्या वेळी पुणे अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, तंत्र अधिकारी नीलेश गढरी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT