पुणे

Ganeshotsav 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; 310 मूर्तींचे विसर्जन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'लवकर या', गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…' अशा जयघोषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या गणरायाचे बुधवारी विसर्जन करण्यात आले. नदीपात्रात विसर्जनाला मनाई असल्याने बहुतांश नागरिकांनी महापालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर दिला. तर काहींनी मूर्ती दान करून समाजभान जपले. काहींनी घरीच घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. बाप्पाला निरोप देताना 'पुढच्या वर्षी लवकर या' असे साकडेही भाविकांनी घातले. गणेश चतुर्थीला म्हणजेच मंगळवारी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जल्लोषात करण्यात आली.

संबंधित बातम्या :

तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी काहींनी घरांमध्ये प्रथा आणि परंपरेप्रमाणे गणेशमूर्तींचे विसर्जन केले. नदीतील घाटांवर पालिकेकडून विसर्जनासाठी हौद तयार करण्यात आले असून, नागरिकांनी हौदात गणेश मूर्तींचे विसर्जन केले, तर काहींनी घरातच किंवा जवळच्या हौदात गजाननाच्या मूर्तीचे विसर्जन केले. गणपतीची षोडशोपचार पूजा केल्यानंतर वस्त्र व नैवेद्य अर्पण करून विसर्जन करण्याची परंपरा भाविकांनी जपली. बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त भावूक झाले होते. शाडू मातीची गणेशमूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या नागरिकांनी घरातच कुंड, बादलीमध्ये विसर्जन केले, तर काहींनी मूर्ती दान केली. फिरते विसर्जन हौद आणि निर्माल्य कलश उपलब्ध नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली.

310 मूर्तींचे विसर्जन

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने व्यवस्था केलेल्या बांधीव हौद, लोखंडी टाक्या, मूर्ती दान व संकलन केंद्रांची व्यवस्था केली असून, यामध्ये दीड दिवसाच्या 310 मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. जल्लोषपूर्ण व उत्साही वातावरणात लाडक्या बाप्पाचे मंगळवारी आगमन झाल्यानंतर बुधवारी दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाले. विसर्जनासाठी पालिकेने शहरात 42 बांधीव हौद, 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्या, आणि 252 ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र, दान केंद्र आणि 256 निर्माल्य कलशांची व्यवस्था केली होती. 310 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात बांधलेल्या हौदात 127, लोखंडी टाक्यांमध्ये 173, मूर्ती संकलन केंद्रात 10 असे विसर्जन झाले. तर 219 किलो निर्माल्य जमा झाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT