पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोडाऊनच्या भाड्याच्या कारणातून झालेल्या वादात पाच ते सहा जणांनी मिळून लोखंडी रॉडने मारहाण करीत गोडाऊन मालकाचा खून केला. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संबंधित व्यक्तीच्या अपघाताचा बनाव रचला. मात्र, लोणीकंद पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या.
बाजीराव सुदाम खांदवे (वय 55, रा. हरमतळे वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, पोलिसांनी लक्ष्मण नारायण इमनेलू (वय 38, रा. पाटोदा खुर्द, ता. धर्माबाद, नांदेड) याला ताब्यात घेतले असून, मुख्य सूत्रधार नागेश नाईक आणि त्याचे इतर साथीदार फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदवे यांचे पठारे वस्ती-लोहगाव येथे गोडाऊन आहे. ते नाईकला भाड्याने दिले आहे. भाड्याच्या कारणातून त्यांचा वाद झाला होता. खांदवे यांना नाईक याने गोडाऊनवर बोलावून घेतले. तेथे त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. पुढे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रिक्षामध्ये खांदवे यांचे प्रेत टाकून वाघोली परिसरातील एका बंद पडलेल्या खदानीत टाकून दिले होते.
कोणाला खुनाचा सुगावा लागू नये म्हणून आरोपींनी खांदवे यांचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. दरम्यान, 31 ऑक्टोबरला येथील खदानीत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात आणि घटनास्थळावरील संशयास्पद बाबीमुळे खांदवे यांचा खून झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
दरम्यान, विमानतळ पोलिस ठाण्यात खांदवे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. अधिक तपास केला असता नाईक आणि चार कामगार अचानक काम सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून खांदवे यांच्या मोबाईलची माहिती काढली. त्या वेळी नाईक आणि त्याच्या साथीदाराचे पठारे वस्ती परिसरात एकाच ठिकाणी कॉलिंगचे लोकेशन सापडले. त्यानंतर पोलिसांनी इमनेलू याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी करून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गोडाऊनच्या भाड्याच्या कारणातून नागेश नाईक आणि इतरांनी मिळून खांदवे यांचा खून केल्याचे सांगितले. पुढील चौकशीसाठी आरोपीला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त शशीकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हे निरीक्षक मारुती पाटील, सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, हवालदार संदीप तिकोणे, कर्मचारी स्वप्नील जाधव, अजित फरांदे, कैलास साळुंके, शुभम चिनके, परमेश्वर आघाव, आशिष लोहार यांच्या पथकाने केली.
हेही वाचा