

बीजिंग : चीनने आपल्या अंतराळ स्थानकात विविध भाज्या पिकवल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. आता या अंतराळ स्थानकातून नवी माहिती समोर आली आहे. या चिनी स्थानकातील अंतराळवीरांनी तिथे टोमॅटो व लेट्यूसचे उत्पादन घेतले असून त्याचे सॅलडही बनवून खाल्ले!
विविध देशांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाप्रमाणेच चीनने स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण केलेले आहे. असेच अंतराळ स्थानक बनवण्याची भारताचीही योजना असून ती आपल्या महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेनंतर आकारास येईल. चीनच्या अंतराळ स्थानकात विविध प्रयोग केले जात आहेत. त्यामध्ये भाज्यांच्या उत्पादनाचाही एक प्रयोग आहे. आता तिथे टोमॅटो व लेट्यूसचे उत्पादन घेण्यात आले आहे. या स्थानकावर गेलेल्या 'शेनझोऊ-16' मिशनमधील अंतराळवीरांनी त्याचे सॅलडही बनवून खाल्ले. अंतराळ पर्यटनास अधिक व्यवहार्य बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
'शेनझोऊ-16' मिशनमधील अंतराळवीर अनेक महिन्यांच्या दीर्घ अशा अंतराळ निवासानंतर आता पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे सर्वात मोठे यश म्हणजे अंतराळ स्थानकात केलेली टोमॅटो आणि लेट्यूसची शेती. मिशन कमांडर जिंग हॅपेंग यांनी अंतराळवीर झू यांगझू आणि गुई हाइचाओ यांच्या साथीने जूनमध्ये भाज्यांची शेती केली. त्यांनी लेट्यूसची चारवेळा कापणीही केली. या यशानंतर त्यांनी ऑगस्टमध्ये चेरी टोमॅटो आणि हिरव्या कांद्यावर लक्ष केंद्रीत करून दुसरी मोहीम सुरू केली. हा प्रयोगही यशस्वी ठरला.