खेड : अन्न आणि औषधे विभागाचा निरीक्षक असल्याचे भासवुन मेडिकल दुकानाची (औषध विक्री) तपासणी करणारा तसेच त्यातील नसलेले दोष दाखवुन २० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया निरीक्षकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. मेडिकल संघटनेच्या सदस्य, दुकानदारांनी मंगळवारी (दि. २३) उघडकीस आणलेल्या या प्रकाराने राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली.
आकाश कोंडुसकर (मुळ नाव आनंद भुजंग, वय ३४, रा. सांगवी, पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तोतया निरीक्षकाचे नाव आहे.
राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आवरा बाहेर असलेल्या भवानी मेडिकलमध्ये एक व्यक्ती आली. त्याने आपण अन्न आणि औषध विभागाचा वरिष्ठ निरीक्षक असल्याचे सांगितले. त्याने विविध चौकश्या सुरू केल्या आणि २० हजार रुपयांची मागणी केली. असे करताच मेडिकल चालक तरुण चौधरी यांनी त्याचे आय कार्ड पाहण्यासाठी मागितले. हे कार्ड पाहण्यासाठी घेतल्यावर नेहमी येणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा नवीन वाटणारे नाव वाचुन घेतले.
बाजुला जाऊन संघटनेतील राजु चौधरी, निलेश आरबुज व इतर सदस्यांना त्यांनी संपर्क साधला. पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाला तातडीने संपर्क साधला. अशा नावाचा कोणीही अधिकारी आपल्या विभागात नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या निरीक्षकाला थांबवुन ठेवण्याचे सांगण्यात आले; मात्र संशय आल्याने हा तोतया पोलिस निरीक्षक नाष्टा करून परत येतो म्हणुन येथुन निसटला. राजू चौधरी, निलेश आरबुज व इतरांनी तो गेलेल्या मार्गावर त्याचा मागोवा घेतला. एका सीएनजी पंपावर हा व्यक्ती त्याच्या वॅगन आर वाहनात गॅस भरून घेत असल्याचे दिसून आले.
सगळ्यांनी त्याला घेरले. प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्याची गाळण उडाली. तो जाण्याचा प्रयत्न करू लागला; मात्र मेडिकल संघटनेच्या सदस्यांनी त्याला पोलिस ठाणे दाखवले. तोतयागिरी आणि त्याद्वारे फसवणुक करण्यावरून आकाश कोंडुसकर (मुळ नाव आनंद भुजंग, वय ३४, रा. सांगवी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी याच व्यक्तीने आळंदी परिसरात अशाच प्रकारे अनेक मेडिकल दुकानदारांना अधिकारी असल्याचे सांगुन लाखो रुपये लुबाडल्याचे मेडिकल संघटनेचे अध्यक्ष धनंजय गारगोटे यांनी सांगितले. राजू चौधरी, निलेश आरबुज , नितीन पवळे, श्रीकांत आरुडे, मोहसीन आत्तार, केतन घोरपडे आदी मेडिकल संघटनेच्या सदस्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.