पुणे

Pune News : महागड्या तपासण्या मोफत कधी ? गरीब रुग्णांचा सवाल

अमृता चौगुले
पुणे : राज्य शासनाने औंध जिल्हा रुग्णालयात 15 ऑगस्टपासून अनेक उपचार आणि तपासण्या मोफत केल्या असल्या तरी महागड्या सिटी स्कॅन, एमआरआय या तपासण्याही मोफत कधी मिळणार, असा प्रश्न रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक विचारत आहेत. खासगी रुग्णालयांमधील महागडे दर, तर शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी नाही, अशा कात्रीत गरीब रुग्ण सापडले आहेत. औंध जिल्हा रुग्णालयात औषधांसह रक्ततपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी या तपासण्याही मोफत उपलब्ध झाल्या आहेत.
संबंधित बातम्या :
त्यामुळे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरात ससून रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी दरात सिटी स्कॅन, एमआरआय या तपासण्या केल्या जातात. मात्र, बहुतांश ठिकाणी सेवा पीपीपी तत्त्वावर पुरवल्या जात असल्याने ठरावीक शुल्क भरावे लागते.
रुग्णसंख्या किती? (जानेवारी ते सप्टेंबर)
  • औंध जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार सुरू करण्यापूर्वी आंतरररुग्ण विभागात दररोजच्या रुग्णांची संख्या 160 ते 170 इतकी होती. आता रुग्णसंख्या 220 ते 230 पर्यंत वाढली आहे.
  • या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत सर्व 14 विभागांत मिळून 9 हजार 655 रुग्णांनी उपचार घेतले आहेत. म्हणजेच दर महिन्याला सरासरी 1300 ते 1400 रुग्ण येथे दाखल होतात.
  • उपचार मोफत झाल्यानंतर म्हणजेच 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान 6050 रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले आहेत.
मी मोशीवरून वडिलांना घेऊन औंध रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी आलो आहे. घराजवळील खासगी रुग्णालयाने 8000 रुपये खर्च सांगितला. ससूनमध्ये खूप गर्दी असल्याने तीन-चार दिवसांनी या, असे सांगितले. जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार सुरू झाल्याने एमआरआय तपासणी मोफत होईल, असे वाटले होते. पण, त्यासाठीही पैसे भरावे लागणार आहेत. गरीब रुग्णांकडे लक्ष द्यायला सरकारला कधी वेळ मिळेल?
– सोपान कांबळे, 
रुग्णाचे नातेवाईक
पीपीपी तत्त्वावरील कंपनीने नोटीस देऊनही अद्याप स्वत:ची सेवा बंद केलेली नाही. याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले आहे. सध्या रुग्णालयामध्ये रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्सरे या चाचण्या मोफत आहेत. शासनाने आदेश दिल्यावर इतर तपासण्याही मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
– डॉ. नागनाथ यमपल्ले, 
जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा
हेही वाचा
SCROLL FOR NEXT