पुणे : महापालिकेच्या पथ विभागाने सेवावाहिन्या टाकण्यासाठी रस्तेखोदाईची परवानगी दिल्याने शहरात विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदाईची कामे सुरू आहेत. अनेक कामे कासव गतीने सुरू असल्याने रेंगाळलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दरम्यान, पथ विभागाने यंदा 65.27 किलोमीटरच्या खोदाईस परवानगी दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 31 एप्रिल या कालावधीत विविध सेवावाहिन्या टाकण्यासाठी शहरातील रस्त्यांवर खोदाई करण्याची सशुल्क परवानगी दिली जाते. यातून महापालिका उत्पन्न मिळते. खोदाईची कामे झाल्यानंतर तातडीने संबंधित रस्ता पूर्ववत करण्याचे व काम सुरू असताना कामाची माहिती देणारा फलक लावण्याचे बंधन संबंधित कंपनीला
घातलेले असते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने बीएसएनएल, एमएनजीएल, एमएसईडीसीएल, टाटा, महामेट्रो व इतर संस्थांना जवळपास 47.22 किलोमीटर लांबीच्या रस्तेखोदाईची परवानगी दिली आहे. तसेच महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या टाकण्यासाठी 18.5 किमी लांबीच्या खोदाईची परवानगी दिली आहे. याशिवाय ड्रेनेजलाइन व पावसाळी लाइन टाकण्यासाठीही खोदाईची परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांसह उपनगरांतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदाईची कामे सुरू आहेत.
ही कामे तीव्र गतीने होत नाहीत. झालीच तर रस्ते तातडीने पूर्ववत केले जात नाहीत. पाइपलाइन किंवा सेवा वाहिनी टाकल्यानंतर झालेले खड्डे बुजविले जातात. मात्र, त्यावर डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण लवकर केले जात नाही. राडारोडा जागेवरच पडलेला असतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खडी, माती, धुळीचे साम्राज्य असते. परिणामी, अशा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा परिणाम परिसरातील इतर रस्त्यांवरही होऊन सर्वत्र कोंडी तयार होते. त्यामुळे रेंगाळलेल्या कामाचा नागरिक आणि वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरू होतो. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहत असल्याने अत्यावश्यक दुरुस्तीची कामे वगळता रस्तेखोदाई बंदच राहते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने 1 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय कुठल्याही पद्धतीच्या खोदाईला परवानगी देण्यात येणार नाही. सध्या सुरू असलेली खोदाईची कामे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत, तर 31 मेपर्यंत खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशा सूचना सर्व विभागांना करण्यात आल्या आहेत.
शहरातील विविध रस्त्यांवर ड्रेनेजलाइन व पावसाळी लाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. यासाठी किती किमी लांबीच्या रस्त्याच्या खोदाईस परवानगी देण्यात आली किंवा मलनिस्सारण विभागाने किती किमीची परवानगी घेतली, याबाबत पथ विभागाचे प्रमुख आणि मलनिस्सारण विभागाचे प्रमुख या दोघांनाही कसलीही माहिती नाही. दोघांनीही याबाबत आपणास कल्पना नसल्याचे उत्तर 'दैनिक पुढारी'शी बोलताना दिले.
कामाच्या ठिकाणी खोदाई करणारी कंपनी, ठेकेदार, जबाबदार अधिकार्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक, काम कधी सुरू केले आणि कधी संपणार, याची माहिती असलेला फलक लावणे, वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी म्हणून दिशादर्शक फलक लावणे, ट्रॅफिक वॉर्डन नेमणे आदी सूचना महापालिकेकडून परवानगी देताना दिल्या जातात. मात्र, अशा प्रकारचे माहिती फलक लावलेले दिसत नाहीत. पर्यायी रस्त्यांचे फलक नसल्याने चालकांना ऐनवेळी माघारी फिरावे लागते.
हेही वाचा