कोल्हापूर : दक्षिणमध्ये काँग्रेस, भाजपची रंगीत तालीम | पुढारी

कोल्हापूर : दक्षिणमध्ये काँग्रेस, भाजपची रंगीत तालीम

विकास कांबळे

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधील पाटील विरुद्ध महाडिक यांच्यातील लढत हायहोल्टेज सामना म्हणूनच ओळखली जाते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने येथे काँग्रेस व भाजपची रंगीत तालीमच होणार आहे. यामुळेच दोन्ही गटांनी आपली ताकद लावली आहे.

पूर्वी कोल्हापूर  शहर असा विधानसभेचा मतदारसंघ होता. त्यानंतर शहराचे कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण असे दोन मतदारसंघ झाले. यात कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील शहराच्या जवळपासच्या गावांचा समावेश करून कोल्हापूर दक्षिण असा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच पाटील विरुद्ध महाडिक अशीच लढत झाली आहे.

माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यापासून फारकत घेत आ. सतेज पाटील यांनी आपले स्वतंत्र संघटन सुरू केले. आपल्या गटाची ताकद जिल्ह्यात वाढवण्यासह महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संस्थांत वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. यात त्यांना जिल्ह्यातील अन्य नेत्यांनीही साथ दिली. त्यामुळे आ. पाटील यांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना वगळता महाडिक यांच्या ताब्यातील सर्व संस्था काढून घेण्यात यश मिळविले आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मात्र हा मतदारसंघ कायम फिरता ठेवला आहे. सन 2009 मध्ये सतेज पाटील व धनंजय महाडिक यांच्यात लढतीतआ. सतेज पाटील विजयी झाले. त्यानंतर 2014 मध्ये मात्र आ. पाटील यांना हा मतदारसंघ राखता आला नाही. आ. पाटील यांनी या मतदारसंघावर इतकी मजबूत पकड बसवली होती की, त्यांच्या विरोधात कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता; परंतु माजी आ. महाडिक यांनी मुलगा अमल यांनाच कोल्हापूर दक्षिणमधून भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरविले. अमल महाडिक यांच्या नावाची चर्चाही कधी नव्हती; परंतु अचानक त्यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले. या निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीत आ. पाटील यांनी पुतण्या ऋतुराज यांना दक्षिणमधून रिंगणात उतरविले व विजयी करून पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले.

या विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे 37 प्रभाग व 35 गावांचा समावेश आहे. यात शहरालगतच्या गावांचा समावेश आहे. महापालिकेसह जि. प. व पं. स.वरही प्रशासक आहे. प्रत्येक ठिकाणी महाडिक व पाटील गट आहेत. गेल्या लोकसभेला आ. पाटील यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना मदत केली होती; परंतु आता ते शाहू महाराज यांच्या प्रचाराची धुरा वाहत आहेत. धनंजय महाडिक खासदार झाल्यानंतर महाडिक गटाला थोडे बळ मिळाले. त्यांनी फोडाफोडी सुरू केली आहे. पाटील गटाचे काही कार्यकर्ते त्यांनी आपल्याकडे घेतले आहेत. महाडिकांनी आपली ताकद संजय मंडलिक यांच्या बाजूने लावली आहे. दक्षिणमधील आपली ताकद दाखवण्यासाठी आ. पाटील व महाडिक गटांनी चांगलीच कंबर कसली आहे. विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच दोन्ही गट लोकसभा निवडणुकीकडे पाहत आहेत.

Back to top button