पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेकडे नव्याने नियुक्त होणार्या 181 प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची थेट पोलिसांच्या सायबर सेलकडून पडताळणी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये टीईटी, सीईटी आणि अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे. 2022 मध्ये झालेल्या टीईटी घोटाळ्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यातून धडा घेऊन जिल्हा परिषद सतर्क झाली असून, नव्याने नियुक्त होणार्या शिक्षकांच्या टीईटीसह इतर प्रमाणपत्रांचे अनुक्रमांक देऊन सायबर सेलकडून पडताळणी करून घेतली जाणार आहे.
पुण्यासाठी 274 शिक्षकांची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून 181 शिक्षक देण्यात आले. आतापर्यंत 149 उमेदवारांचे चारित्र पडताळणी झाली असून 22 बाकी आहेत. सर्व प्रक्रिया बघता 10 जूनपर्यंत सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षक भरती प्रक्रियेतील 171 शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून समुपदेशन झाले असून 3 जण कागदपत्र तपासणीला तर 7 जण उपस्थित राहिले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण झाली असताना अद्यापही या शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. त्यावरून उमेदवारांकडून नियुक्ती आदेश देण्याची सतत मागणी होत आहे. दरम्यान, नियुक्त होणार्या सर्व शिक्षकांची पोलिस पडताळणीसह समांतर आरक्षणाची देखील पडताळणी केली जात आहे.
या प्रक्रियेला वेळ लागत आहे. आतापर्यंत 174 पैकी 22 उमेदवारांची चारित्र पडातळणी अहवाल जिल्हा परिषदेला मिळालेले नाहीत. भूंकपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक या आरक्षणाची माहिती त्या-त्या विभागांकडून मागवली आहे. तसे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उमेदवारांना आणि विभागांना इमेल देखील करण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. टीईटी घोटाळा उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घोटाळ्यात अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून ही परीक्षा पास करत नोकरी मिळवली होती. हे टाळण्यासाठी, सायबर सेलकडूनच प्रमाणपत्र तपासणी करून घेतली जाणार आहे. सायबर सेलकडून प्रमाणपत्र पडताळणीचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उमेदवारांना नियुक्ती आदेशाची प्रक्रिया होणार असल्याचेही सांगण्यात आले.
टीईटी, सीईटी आणि अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या प्रमाणपत्रांचे अनुक्रमांक सायबर सेलला कळविण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.
– संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद.
हेही वाचा