औषधांचा दुष्परिणाम तपासण्यासाठी प्रयोगशाळेत बनवली सूक्ष्म हृदये

औषधांचा दुष्परिणाम तपासण्यासाठी प्रयोगशाळेत बनवली सूक्ष्म हृदये
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आपल्या हृदयाची रचना कशी असते, हृदयाच्या पहिल्यावहिल्या ठोक्याला चालना कोण देते, अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. केवळ संशोधक किंवा डॉक्टरांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांसाठीही मानवी हृदयाची यंत्रणा कुतूहलाचा विषय असते. आता संशोधकांनी अभ्यासासाठी प्रयोगशाळेत काही छोटी हृदये विकसित केली आहेत. त्याचा उद्देश वेगवेगळ्या औषधांचा हृदयावर कसा दुष्परिणाम होऊ शकतो, हे पाहण्याचा आहे. विशेषतः 'काँजेनिटल डिफेक्टस्'बाबत अधिक समजून घेण्यासाठी संशोधक अशी सूक्ष्म हृदये विकसित करीत आहेत.

मानवी भ्रुणामधील सर्वात पहिला पूर्णपणे विकसित झालेला अवयव हृदय हाच असतो. भ्रूण विकसित झाल्यावर चौथ्या आठवड्यातच ते एका साध्या ट्युबप्रमाणे रक्त 'पंप' करण्यास सुरुवात करते. नवव्या आठवड्यापर्यंत ते पूर्णपणे तयार होते. त्याची सुरुवातीलाच निर्मिती होणे आवश्यकच असते कारण तेच पूर्ण शरीरभर विकसित होणार्‍या गर्भासाठी आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचवते. मात्र, सुरुवातीलाच असे विकसित झाल्याने हृदयाला बाळाची गर्भवती आई ज्या प्रदूषित घटकांच्या आणि औषधांच्या संपर्कात येते, त्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे जन्मावेळी निर्माण होणार्‍या बाळातील समस्यांमध्ये 'काँजेनिटल हार्ट डिसीज' हा एक प्रमुख आजार आहे.

जगभरात शंभरपैकी एका बाळामध्ये ही समस्या असते. पारंपरिक पद्धतीने हृदयाचा विकास आणि आजार यांचा अभ्यास करण्यासाठी प्राण्यांची हृदये किंवा सेल मॉडेल्सचा वापर केला जातो. मात्र, अशी हृदये मानवी हृदयांची गुंतागुंत प्रकट करण्यास सक्षम नसल्याने काँजेनिटल हार्ट डिसीजसारख्या आजाराचा नेमका अभ्यास व उपचार याबाबतचे संशोधन करण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही. त्यामुळे आता अशा प्रयोगांसाठी अमेरिकेतील प्रयोगशाळेतच 'मिनी ह्युमन हार्टस्' विकसित केले जात आहेत. त्यासाठी अर्थातच स्टेमसेल्स म्हणजेच मूळपेशींचा वापर केला जात आहे. शरीरातील मूळपेशी या अशा पेशी असतात, ज्यांचे रूपांतर शरीराच्या कोणत्याही अवयवांच्या पेशींमध्ये करता येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news