प्रतीकात्मक छायाचित्र File Photo
पुणे

Calendar 2026 : इंग्रजी कॅलेंडर आणि हिंदू दिनदर्शिकेमध्ये नेमका फरक कोणता? जाणून घ्या सविस्तर

ग्रेगोरियन कॅलेंडर हे फक्त नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सोयीसाठी, हिंदू कालगणना खगोलीय घटनांशी संबंधित

पुढारी वृत्तसेवा

हिंदू कालगणनेत सूर्य, चंद्राची गती मोजली जाते, नक्षत्र, योग, करण, ग्रहगणित या सर्व गोष्टी एकत्र करून एक दिवस ठरवला जातो.

English Calendar vs Hindu Panchang

पुणे: अवघ्या काही तासांमध्ये नवीन वर्षारंभ होत आहे. आपण सर्वजण १ जानेवारीपासून इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो; पण हिंदू धर्मशास्त्रानुसार नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते. तेही पण आपण साजरा करतो. आता इंग्रजी कॅलेंडर आणि सनातन हिंदू कालगणनेमध्ये नेमका काय फरक आहे हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. जाणून घेऊया पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीविषयी...

पोप ग्रेगरी यांनी १५८२ मध्‍ये सुरु केली इंग्रजी कालगणना

पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांनी यू ट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून ग्रेगोरियन कॅलेंडर आणि आपल्या सनातन हिंदू कालगणनेमध्ये नेमका फरक कोणता यासंदर्भात सांगितले आहे की, "आधीपासून सुरू असणाऱ्या इंग्रजी कालगणनेला 1582 साली पोप ग्रेगरी यांनी एक विशिष्ट स्थान दिले. आजपासून फक्त 400 ते साडेचारशे वर्षांपूर्वीचा ग्रेगोरियन कालगणनेला इतिहास आहे. त्यापूर्वी जुलियन कॅलेंडर अस्तित्वात होतं, ते वापरलं जायचं."

कोणत्या आधारावर आहे इंग्रजी कॅलेंडर?

पृथ्वी सूर्याभोवती फिरते तोच तो आधार, त्या बदलावरून 365 दिवसांचे वर्ष ठरवायचे असा इंग्रजी कॅलेंडरचा आधार आहे. पृथ्वीच्या एका परिभ्रमणाला, सूर्याभोवती जी ती पृथ्वी फिरते त्याला 365.2425 इतके दिवस लागतात. यामध्ये सूर्य, चंद्र, नक्षत्र, ग्रहगती यापैकी काहीही विचारात घेतले गेलेले नाही. फक्त दिवसांची मोजदाद केलेली आहे. वर्षातील 365 कधी 366 दिवस मोजण्यासाठी सरकारी काम, व्यवहार, ऑफिसची वेळापत्रके, बँक आणि शाळांची वेळापत्रके या सगळ्यांसाठी इंग्रजी कॅलेंडर योग्यच आहे. कारण ते दिवसागणिक फक्त दिवस मोजतेय; पण हिंदू कालगणना वेगळी आहे, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

हिंदू कालगणनेत मोजली जाते सूर्य आणि चंद्राची गती

सनातन हिंदू कालगणना ही प्राचीन आहे. वेदांमध्ये काळ, ऋतू, नक्षत्र यांचा उल्लेख सापडतो. त्याचबरोबर खगोलशास्त्राचे प्राचीन ग्रंथ सूर्यसिद्धांत, आर्यभट्ट रचित आर्यभटीयम्, पंचसिद्धांतिका, विष्णुधर्मोत्तर पुराण, नारद पुराण यामध्ये कालगणनेचे नुसते उल्लेखच नाही तर त्याचे नियम आहेत. आपली कालगणना फक्त दिवस मोजते असं नाहीये, तर ती सूर्याची गती मोजते, चंद्राची गती मोजते, नक्षत्र, योग, करण, ग्रहगणित या सर्व गोष्टी एकत्र करून एक दिवस ठरवला जातो. हिंदू कॅलेंडर लुना म्हणजे चंद्र आणि सोलर म्हणजे सूर्य, म्हणजे सौर आणि चांद्र दोन्हीच्या गतीवर आधारित अशी ही हिंदूंची प्राचीन कालगणना असल्याचे गौरव देशपांडे सांगतात.

तारीख आणि तिथी यामधील फरक काय?

इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 वाजल्यानंतर तारीख बदलते. तो दिवसातील 24 तासांचा एक ठराविक वेळ आहे. तर तिथी ही तासांवर अवलंबून नाही. तिथी ही चंद्र-सूर्य यांच्या अंशात्मक कोनावर आधारित असते. चंद्र आणि सूर्य यामध्ये 12 अंशांचा फरक झाला की, आकाशामध्ये एक तिथी बदलते. म्हणून कधी एक तिथी 21 तास 36 मिनिटांची असते, तर कधी 24 तासांची असते, कधी जास्तीत जास्त 26 तासांची तिथी असते. कारण ही गतीवर आधारित आहे. चंद्र, सूर्याची गती जशी बदलते, तशी तिथीच्या तास-मिनिटांमध्ये देखील फरक येतो. कधी एकाच दिवशी दोन तिथी येतात. कधी दोन सूर्योदयांना एक तिथी असते. कधी तिथीचा क्षय होतो तर कधी वृद्धी होते. हा नियम लाखो वर्षांपूर्वीचा अनादी ग्रंथ सूर्यसिद्धांत, ज्याला पाचवा वेद देखील म्हटलेले आहे, त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे संस्कृतमध्ये दिलेला आहे, असेही देशपांडे यांनी नमूद केले आहे.

हिंदू धार्मिक विधी सूर्योदयावर आधारित कालगणनेवर

दिवसाची सुरुवात इंग्रजी कालगणनेनुसार मिडनाईट म्हणजे मध्यरात्री होते; पण हिंदू कालगणनेनुसार सूर्योदयाला दिवसाची सुरुवात होत असते. प्राचीन धर्मशास्त्र ग्रंथात देखील सूर्योदय ते सूर्योदय, उदयात उदयम् वारा असा वाराचा उल्लेख केलेला आहे. म्हणूनच आपण जी देवपूजा करतो, व्रत करतो, यज्ञ, वेगवेगळे विवाह इत्यादी संस्कार करतो, अगदी श्राद्धपक्ष करतो हे सर्व सूर्योदयावर आधारित कालगणनेवर आधारित असतात, असेही देशपांडे यांनी स्पष्ट करतात.

दोन्ही कालगणनेमध्ये महिन्यांची पद्धत पूर्णपणे वेगळी

दिवसाची सुरुवात इंग्रजी कालगणनेनुसार मध्यरात्री होते. तर हिंदू कालगणनेनुसार सूर्योदयाला दिवसाची सुरुवात होते. हा एक अत्यंत मूलभूत फरक आहे. हिंदू कालगणना आणि इंग्रजी पाश्चात्य कालगणनेमध्ये महिन्यांची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. इंग्रजी महिन्यांत खगोलीय घटनांचा संबंध नाही. हिंदू कालगणनेमध्ये महिना हा दोन प्रकारे ठरतो. सर्वप्रथम जो महिना ठरतो तो एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा, याला चांद्र महिना असं म्हटलं जातं. तर दुसरा महिना म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्याला सौर महिना असं म्हटलं जातं. म्हणून हिंदू कालगणनेत महिना हा खगोलशास्त्रावर आधारित आहे.

इंग्रजी महिन्यांची नावे रोमन देव, सम्राट किंवा काही लॅटीन शब्दांवरून...

इंग्रजी महिन्यांची नावे खगोलावर आधारित नाहीयेत, तर देवांवर किंवा काही विशिष्ट घटनांवर आधारित आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांची नावे खगोलीय कारणांवर आधारित नाही, तर रोमन देव, सम्राट किंवा काही लॅटीन शब्दांवरून आलेली आहेत. उदाहरणार्थ, जानेवारी महिन्याचे नाव रोमन देव जानस यांच्यावरून आले आहे. जानस हा द्वारांचा देव म्हणजे गॉड ऑफ बिगिनिंग अँड एंडिंग, असे ज्याला म्हणतात. म्हणूनच नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या कालगणनेत जानेवारी या जानस या देवतेवरून झाली आणि जानेवारी शब्द आला. त्याला कोणतेही खगोलीय कारण नाही, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

हिंदू महिन्यांची नावे ही खगोलशास्त्रावर आधारित

हिंदू महिन्यांची चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ ही नावे पूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित आहेत. चैत्र महिन्याचे नाव चित्रा नक्षत्रावरून पडलेले आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला चंद्र हा चित्रा नक्षत्राच्या आसपास असतो, म्हणून त्याला चित्रावरून चैत्र नाव पडले. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला विशाखा नक्षत्र असते. त्यामुळे विशाखावरून वैशाख नाव पडलेले आहे. त्यानुसार ज्येष्ठ, आषाढ, पूर्वाषाढा, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, मघा, फाल्गुन ही नावे नक्षत्रावरून पडली आहेत. या महिन्याचं नाव म्हणजे त्या महिन्यातील पौर्णिमेच्या आसपास चंद्र ज्या नक्षत्रात येतो, तेच त्या नक्षत्राचं नाव असतं, असेही देशपांडे यांनी स्‍पष्‍ट केले. हिंदू कॅलेंडरचा पाया नक्षत्र आहेत. नक्षत्र म्हणजे चंद्र हा 27.3 दिवसांत पृथ्वीभोवती फिरतो आणि रोज एका नक्षत्रातून जातो. याचा उल्लेख ऋग्वेद, यजुर्वेद आणि शतपथ ब्राह्मणामध्ये देखील आलेला आहे. नक्षत्राशिवाय कोणतेही शुभ कामांचे मुहूर्त कधीही मिळत नाहीत. विवाह हा नक्षत्राशिवाय करणं शक्य नाही, कारण विवाहाची स्वतंत्र नक्षत्र आहेत, असेही देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हिंदूंच्या शास्त्रात खगोलीय कालगणनेमध्ये सहा ऋतू

इंग्रजी कॅलेंडर ऋतूंचा आधार आहे. राशीच्या गतीवरती हा ऋतूंचा आधार आहे. इंग्रजी कॅलेंडर काय सांगतं, मार्च म्हणजे स्प्रिंग नावाचा त्यांचा ऋतू तेव्हा सुरू होतो, पण प्रत्यक्षात भारतात तेव्हा उकाडा सुरू होतो. मग हे चुकतं का? तर त्याचं कारण आहे, कारण ग्रेगोरियन ऋतू हे हवामानावर आधारित आहेत. पण आपल्या हिंदूंच्या शास्त्रात खगोलीय कालगणनेमध्ये सहा ऋतू दिले आहेत — वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. ही त्या ऋतूंची नावे असून ती सूर्य कोणत्या राशीत आहे यावर अवलंबून आहेत. ही पद्धत अत्यंत वैज्ञानिक आणि खगोलीय शास्त्रावर आधारित असल्याचेही देशपांडे यांनी नमूद केले.

दोन्हींमध्ये नेमका फरक काय?

हिंदू पंचांग हे वैज्ञानिक आणि ब्रह्मांडाशी जुळलेले कॅलेंडर आहे. तर ग्रेगोरियन कॅलेंडर हे फक्त नागरिकांच्या नागरी उपयोगासाठी आहे, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT