

लंडन : सोशल मीडियातून कोणती भन्नाट माहिती समोर येईल, हे काही सांगता येत नाही. आता यावर्षीच्या कॅलेंडर व चालू वर्षातील घडामोडींबाबतची एक अनोखी माहिती अशीच समोर आली आहे. काही लोकांच्या मते, 2025 मध्ये जे घडतयं तसं आधीच घडलं आहे. 2025 मध्ये जशा विनाशकारी घटना घडत आहेत, तशा घटना 1941 मध्येदेखील घडल्या आहेत. ऐकायला थोडसं फिल्मी वाटतंय ना? पण अशी चर्चा रंगली आहे. याला कारण ठरलं आहे, ते सोशल मीडियावर व्हायरल झालेले कॅलेंडर. हे कॅलेंडर पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. 2025 चे कॅलेंडर हे ‘सेम टू सेम’ 1941च्या कॅलेंडरसारखे आहे! 2025 मध्ये जशा विनाशकारी घटना घडत आहेत, तशाच घटना 1941 मध्ये घडल्याची चर्चा आहे. यामुळे हे कॅलेंडर म्हणजे भयानक योगायोग असल्याचीही चर्चा आहे.
2025 चे कॅलेंडर अगदी 1941 सारखे आहे, अगदी त्याच तारखा आणि तेच दिवस. दर काही दशकांनी, एका वर्षाचे कॅलेंडर जुन्या वर्षाच्या कॅलेंडरशी जुळू शकते, म्हणजेच, तोच दिवस आणि तारीख एकाच दिवशी येऊ शकते; पण 1941 मध्ये घडलेल्या घटनांमुळे 2025 चे कॅलेंडर चर्चेत आले आहे. 1941 आणि 2025 ही दोन्ही लीप वर्षे नाहीत. दोन्हीमध्ये 1 जानेवारी बुधवारी येतो. कॅलेंडरचे असे चक्र सहसा दर 28 वर्षांनी पुनरावृत्ती होते. कारण, ग्रेगोरियन कॅलेंडरमधील आठवड्याचे दिवस आणि तारखा या चक्रात पुनरावृत्ती होतात. 1941 हे वर्ष दुसर्या महायुद्धाचे निर्णायक आणि भयानक वर्ष होते. याच वर्षी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला. जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेने युद्धात उडी घेतली. युद्धाच्या ज्वाला युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये पसरल्या होत्या. म्हणजेच जगातील दोन मोठ्या महासत्ता, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या युद्धात थेट सहभागी होत्या. दुसर्या महायुद्धाचा आशिया आणि युरोपवर मोठा परिणाम झाला. यानंतर अनेक देशांचे नकाशे बदलले. अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला. हे आर्थिक मंदीचे वर्ष मानले गेले.
2025 या वर्षाची सुरुवातच विनाशाने झाली. या वर्षीही जग अनेक संकटांना तोंड देत आहे. विशेषतः, युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दशकांमध्ये अशा युद्धासारख्या परिस्थिती कधीही पाहिल्या नव्हत्या. रशिया-युक्रेन या दोन्ही देशांमधील युद्ध तीन वर्षांपासून सुरू आहे. या वर्षी त्याचे संकट अधिकच वाढलेले दिसते. भारत-पाकिस्तान लष्करी संघर्ष पाहायला मिळाला. यावर्षी, पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर, मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये हा लष्करी संघर्ष झाला. तथापि, दोन्ही देशांनी चार दिवसांनी युद्धबंदी केली. यावर्षी इस्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्ष वाढला. जूनमध्ये इस्रायलने थेट इराणवर हवाई हल्ला केला. इराणने याला प्रत्युत्तर दिले. दोघांमधील हा संघर्ष सहाव्या दिवशीही सुरूच आहे. अमेरिकादेखील या संघर्षात सहभागी होत असल्याचे दिसते. या वर्षीही रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांनी युद्धात उडी घेतली आहे. रशिया थेट युक्रेनशी युद्ध लढत आहे, तर अमेरिका मागून इस्रायल आणि इराणमधील संघर्षात सहभागी आहे आणि आता उघडपणे येऊन इराणविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला जात आहे. या वर्षीही आर्थिक मंदीचे संकेत येऊ लागले आहेत.
2025 आणि 1941 या दोन्ही वर्षांत जागतिक अस्थिरता आणि युद्धसद़ृश परिस्थिती आहे. परंतु, घटनांचे प्रमाण आणि स्वरूप वेगळे आहे. त्यांना एकाच पद्धतीने एकत्र पाहता येत नाही. हे देखील निश्चित आहे की, इतिहासातील घटनांचा संपूर्ण क्रम पुनरावृत्ती होत नाही. परंतु, काही नमुने आणि परिस्थिती वेळोवेळी सारख्याच दिसतात. जर असा व्हिडीओ व्हायरल होत असेल आणि त्यातील घटना समान दिसत असतील, तर त्यासाठी कोणताही तर्क किंवा वैज्ञानिक आधार नाही, असे घडत नाही किंवा ते कधीही घडलेले नाही!