

अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर: नव्या आशा घेऊन येणाऱ्या 2026 वर्षाची चाहूल लागली आहे. येत्या वर्षात 22 सार्वजनिक सुट्या असून, सोबतच दुसरा व चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्टयांचा लाभ मिळणार आहे.
सध्या बाजारपेठेत आलेल्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकांनी दुकाने सजली आहेत. या दिनदर्शिकांत दिनविशेष, राशिभविष्य, लग्न, मुंज, भूमिपूजन, साखरपुडा, वास्तू मुहूर्त आणि महत्त्वाचे सण-उत्सव यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शुभ कार्यासाठी यंदा 46 लग्न मुहूर्त आहेत. या वर्षातील तीन मार्च रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. मात्र यंदा महाशिवरात्र (15 फेब्रुवारी), रंगपंचमी (8 मार्च), अक्षयतृतीया (19 एप्रिल), घटस्थापना (11 ऑक्टोबर) आणि दीपावली लक्ष्मीपूजन (8 नोव्हेंबर) हे महत्त्वाचे सण, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर) हे सर्व रविवारी आल्याने काही सुट्टया गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती, फेब्रुवारीत 19 ला शिवजयंती, एप्रिलमध्ये 14 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 1 मे ला महाराष्ट्र दिन असे महत्त्वाचे दिनविशेष साजरे होतील.
नव्या वर्षात सण आणि उत्सवांची मोठी मालिका आहे. जानेवारीत14 तारखेला मकरसंक्रांत साजरी होईल, फेब्रुवारी महिन्यात 25 ला महाशिवरात्री आहे. 2 मार्चला होळी, तीनला धुलिवंदन, 19 ला गुढीपाडवा, 21 ला रमजान ईद, 26 ला श्रीराम नवमी आणि 31 ला महावीर जयंती आहे. 2 एप्रिला हनुमान जयंती साजरी होईल. मे महिन्यात 1 मे ला बुद्ध पौर्णिमा आणि 27 ला बकरी ईद आहे. जूनमध्ये 26 ला मोहरम तर 29 ला वटपौर्णिमा आहे. ऑगस्ट महिन्यात 17 ला नागपंचमी, 27 ला नारळी पौर्णिमा तर 28 ला रक्षाबंधन येईल. सप्टेंबर महिन्यात चारला श्रीकृष्ण जन्माष्टमी, 14 ला गणेश चतुर्थी, 19 ला ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि 25 ला अनंत चतुर्दशी हे महत्त्वाचे दिवस आहेत. ऑक्टोबरमध्ये 20 ला दसरा आहे. नोव्हेंबर महिन्यात आठला दीपावली नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन, दहाला पाडवा आणि 11 ला भाऊबीज हे प्रमुख दिवस आहेत, तर 24 ला गुरुनानक जयंती आहे. वर्षातील सणांचा शेवट 25 डिसेंबरच्या ख्रिसमस नाताळने होईल.