Dr Baba Adhav Pudhari
पुणे

Dr Baba Adhav: ‘एक गाव एक पाणवठा‌’चा बुलंद आवाज...' बाबा आढाव यांच्या परिवर्तनयात्रेची अज्ञात पावटणी

दुष्काळ, देवदासी प्रथा, पाणवठे, सत्यशोधक चळवळ आणि फुले-आंबेडकर विचारांना नवी दिशा देणाऱ्या प्रखर समाजसंघटकाच्या कार्याच्या गाभ्यातील कथा

पुढारी वृत्तसेवा

दत्ता काळेबेरे

महात्मा जोतीराव फुले, तमिळनाडूतील क्रांतिकारक समाजसुधारक ई. व्ही. रामास्वामी नायकर यांच्या चळवळीच्या अभ्यासाचा बाबा आढाव यांच्यावर गाढा प्रभाव होता. त्यांच्या विचारांच्या मुळाशी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याची परिणती म. फुले समता प्रतिष्ठानच्या स्थापनेत झाली. म. फुले यांचे वडिलोपार्जित गाव खानवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे 1971 साली प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी अधिक जोमाने बाबा कटिबद्ध झाले.

सन 1972 साली महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला. या संकटकाळातही सवर्ण व दलितांचे पाणवठे वेगवेगळे होते. बाबांनी ‌‘एक गाव एक पाणवठा‌’ असा बुलंद नारा दिला आणि अवघ्या महाराष्ट्रात पाणवठा मोहीम प्रभावीपणे चालवली. या चळवळीमध्ये आलेले अनुभव त्यांनी ‌‘एक गाव एक पाणवठा‌’ या ग्रंथामध्ये कथन केले आहेत. या चळवळीचे फलस्वरूप म्हणजेच विद्यमान महाराष्ट्रातील बहुतांश गावांत दलित-सवर्णांचे पाणवठे एक झाले आहेत. म. फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने मार्च 1974 मध्ये ‌‘पुरोगामी सत्यशोधक‌’ या त्रैमासिकाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन झाले.

डॉ. बाबा आढाव, डॉ. य. दि. फडके, डॉ. अनिल अवचट, नागेश चौधरी यांचे संपादक मंडळ व सहसंपादक दत्ता काळेबेरे व रावसाहेब पवार होते. प्रकाशन समारंभाला थोर साहित्यिक विजय तेंडुलकर, डॉ. बापू काळदाते, हमीद दलवाई, यदुनाथजी थत्ते उपस्थित होते. गेली 51 वर्षे ‌‘पुरोगामी सत्यशोधक‌’ अखंडपणे प्रकाशित होत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीचे प्रतिबिंब ‌‘पुरोगामी सत्यशोधक‌’मध्ये उमटले. ‌‘पुरोगामी सत्यशोधक‌’च्या पहिल्या अंकातील ‌‘शरीर विकणाऱ्या स्त्रिया‌’ या शीलाताई आढाव यांच्या लेखामुळे देवदासी महिलांचे भीषण वास्तव समाजासमोर आले. परिणामतः प्रतिष्ठानने देवदासी प्रथा निर्मूलन चळवळ सुरू केली. बाबांनी 1974 साली गडहिंग्लज येथे पहिली देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसन परिषद आयोजित केली.

कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागात आंदोलने केली. सौंदत्तीला यल्लमाच्या देवस्थानी सत्याग्रह केले. निपाणीचे प्रा. सुभाष जोशी, गडहिंग्लजचे प्रा. विठ्ठल बन्ने, कोल्हापूरचे सुरेश आणि रमेश शिपूरकर यांनी बाबांना प्रभावी साथ दिली. बाबा आढाव, अनिल अवचट, अरुण लिमये, दत्ता काळेबेरे यांनी पुरोगामी सत्यशोधक व अन्यत्र, लेख लिहिले. बाबांच्या नेतृत्वाखाली चालविलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारने देवदासी पुनर्वसन आयोग नेमला. देवदासी प्रथा निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली. देवदासी प्रतिबंध कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. वृद्ध देवदासींसाठी पेन्शन सुरू केली. मुंबईला कामाठीपुऱ्यामध्ये मनोहर कदम व प्रतिमा जोशी यांनी देवदासी पुनर्वसनाचे व निर्मूलनाचे कार्य अनेक संकटांना सामोरे जात ध्येयवादाने व धीरोदात्तपणे केले. निपाणी येथे ‌‘सावली केंद्र‌’ प्रतिष्ठानतर्फे सुरू केले. आज देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसनाला जी गती मिळाली, त्यामध्ये बाबांच्या परिश्रमांचा सिंहाचा वाटा आहे.

डॉ. बाबा आढाव यांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू आहेत. ते उत्कृष्ट वक्ते, संघटक, उपक्रमशील नेते, विविध चळवळी व आंदोलनांचे प्रणेते, क्रियाशील सुधारक, लेखक, पत्रकार व सामाजिक इतिहासाचे संशोधक आहेत. तरुण वयात त्यांनी लिहिलेल्या कवितांची वही मी पाहिलेली आहे. बाबांनी आणीबाणीमध्ये येरवडा कारागृहातील अनुभवावर आधारित ‌‘संघाची ढोंगबाजी‌’ आणि ‌‘संघापासून सावध‌’ या लिहिलेल्या लेखांमुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.

‌‘महाराष्ट्राच्या राजकारणातील मराठा जातीचे प्राबल्य‌’ या लेखामुळे आणि ‌‘हे तर शेठजी भटजीचे आधुनिक दासच‌’ या पुस्तकामुळे बाबांनी स्वकीयांचा संताप ओढवून घेतला होता. ‌‘एक गाव एक पाणवठा‌’ या ग्रंथाचा समावेश मराठीतील अत्युत्कृष्ट साहित्यकृतीमध्ये होता. या पुस्तकातील अनुभवांमुळे अवघा महाराष्ट्र हेलावला. ‌‘सत्यशोधनाची वाटचाल‌’ आणि ‌‘सुंबरान‌’ हे त्यांचे लेखनसंग्रह वाचकप्रिय ठरले. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पत्रकारितेवर त्यांनी विशेषांक प्रकाशित केला. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतील दिनकरराव जवळकर, कृष्णराव भालेकर, ‌‘जागृती‌’कार पाळेकर यांची ग्रंथसंपदा त्यांनी प्रकाशित केली. म. फुले समग्र वाङ्मयात त्यांनी मौल्यवान भर टाकली.

म. फुले यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन केलेल्या जोतीराव फुल्यांच्या आठवणी ‌‘आम्ही पाहिलेले फुले‌’ या पुस्तकात बाबांनी प्रकाशित केल्या. डॉ. विश्राम रामजी घोले, हरी रावजी चिपळूणकर या म. फुले यांच्या सहकाऱ्यांच्या जीवन व कार्यावर बाबांच्या प्रेरणेमुळेच प्रकाशझोत पडला. म. फुले यांचे मृत्यूपत्र बाबांमुळेच प्रकाशात आले. सत्यशोधक चळवळीचा इतिहास सांगणारी कागदपत्रे, आठवणी, गोळा करण्यासाठी बाबांनी अथक प्रयत्न केले. ‌‘पुरोगामी सत्यशोधक‌’ आणि ‌‘हमाल मापाडी‌’ वार्तापत्राचे ते संपादक होते. बाबा आढाव यांच्या लेखक, प्रकाशक, पत्रकार, सामाजिक इतिहासांचे संशोधक या भूमिकांवर जनसामान्यांचे व विद्वानांचेही फारसे लक्ष जात नाही, याचे आश्चर्य वाटते.

(लेखक महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व डॉ. बाबा आढाव यांचे निकटवर्तीय असून, त्यांच्यासमवेत 60 वर्षे काम करण्याचे भाग्य त्यांना लाभले.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT