

खेड : पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. १०) नागपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून जवळपास १५ हजाराहून अधिक पोलिस पाटील या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती राज्य गाव पोलिस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिली.
वेळोवेळी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने मोर्चा काढला जाणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनासमोर हा मोर्चा धडकणार आहे. पोलिस पाटलांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करावे, रिक्त पदे तत्काळ भरावीत, दर पाच वर्षांनी होणारे नूतनीकरण बंद करावे, प्रवास व इतर भत्त्यांमध्ये वाढ करावी, मानधनात वाढ करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे.
याबाबतचे निवेदन खेडचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांना संघाच्या वतीने देण्यात आले. या वेळी राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, खेड तालुका अध्यक्ष दीपक पावडे, पुणे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पप्पूकाका राक्षे, कार्यकारी अध्यक्ष मारुती हुरसाळे, गणेश प्रधान आदी उपस्थित होते.
या मोर्चात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक पोलिस पाटील सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश शेंडगे, कार्याध्यक्ष विजय कुंजीर, कार्यकारी अध्यक्ष पप्पूकाका राक्षे, महिला आघाडी अध्यक्ष मोनिका कचरे पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी सांगितले.