पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोविडने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना शासनाकडून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान मिळावे यासाठी शहराच्या आरोग्य विभागाकडे तब्बल 14 हजार 278 अर्ज आले असून, त्यापैकी 8 हजार अर्ज महापालिकेच्या आरोग्य खात्याने मंजूर केले आहेत.
हे अर्ज अनुदान मिळावे यासाठी पुणे जिल्ह्याच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडे पाठवले आहेत. तेथे एकदा त्यांची अंतिम पडताळणी झाल्यावर त्यांच्या खात्यावर 50 हजार रुपयांचे अनुदान पाठवले जाणार आहे.शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून पुण्यात उपचारासाठी आलेल्या आणि मृत्यू झालेल्या रुग्णांचे अर्ज महापालिकेकडे आले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अर्जासोबत सर्व कागदपत्रे योग्य जोडली आहेत का याची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर ते पुढे जिल्ह्याच्या आपत्कालिन व्यवस्थापन कक्षाकडे पाठवले जातात. तेथे त्याची पुन्हा पडताळणी होते आणि नंतर अर्जदाराच्या खात्यात अनुदान जमा होते. आतापर्यंत शहरातील रहिवाशी असलेल्या 9 हजार 324 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याकडून आणि बाहेरून पुण्यात येऊन मृत्यू झालेल्यांचाही अर्ज मिळून एकूण 14 हजार 278 अर्ज आले असल्याची माहिती आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.
महापालिकेच्या पडताळणी समितीने आतापर्यंत 2,595 अर्ज फेटाळले आहेत. अपूर्ण माहिती, मोबाईल नंबर नसणे, अपुरी कागदपत्रे जोडणे यामुळे हे अर्ज फेटाळले आहेत. त्यासाठी अर्जदार, मृत यांचे आधारकार्ड, मृत्यूचे प्रमाणपत्र, रुग्णालयात उपचार घेत असलेले प्रमाणपत्र, कोविड पॉझिटिव्ह प्रमाणपत्र आणि अर्जदाराचे किंवा वारसदाराचे बँक खात्याचे डिटेल्स देणे आवश्यक आहे.र्जदारांनी अर्ज भरला म्हणजे त्यांचे काम संपले असे नाही. कारण, आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे वारंवार लॉगइन करून पाहणे गरजेचे आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती कळू शकते.
जर अपूर्ण कागदपत्रांअभावी किंवा इतर कारणांनी अर्ज फेटाळला असेल तर अर्जदारांनी 'अपील टू जीआरसी' या लिंकवर क्लिक करून संबंधित परिसरातील अधिकाऱ्यांची भेटीची वेळ आणि तारीख घ्यावी आणि सर्व कागदपत्रांसह भेटायला जावे आणि आपला अर्ज पुन्हा बरोबर करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील पाच परिमंडळला समित्या स्थापन केल्या असून ही समिती अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करते आणि पुन्हा अर्ज सबमिट करून घेऊन अनुदान मिळण्यासाठी अर्ज मंजूर करते.
नागरिकांनी भरलेल्या फॉर्मचा काय 'स्टेटस' आहे तो ऑनलाइन चेक करायला हवा. तसेच परिमंडळ स्तरावर याबाबतचे समस्या निवारण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत, त्यांचा ज्या पोर्टलवर अर्ज भरला तेथूनच वेळ घ्यावी व भेटावे. जरी रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला असला तरी त्यांच्या नातेवाइकांना अर्ज करता येतो.
– डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे मनपा