पुणे : CA च्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीची आत्महत्या | पुढारी

पुणे : CA च्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीची आत्महत्या

पिंपरी चिंचवड, पुढारी वृत्तसेवा : सीएच्या (सनदी लेखापाल) परीक्षेत अपयश आल्याने पिंपरी चिंचवड येथील एका तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही तरूणी चिंचवड, केशव नगर, येथे राहत आहे. पल्लवी संजय जाधव (२४, रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी सनदी लेखापाल म्हणजेच सीए होण्यासाठी अभ्यास करत होती. त्यासाठी तिने यापूर्वी दोन वेळा ही परीक्षा दिली होती. मात्र, दोन्ही परीक्षेत ती अपयशी ठरली. त्यानंतर तिने पुन्हा तिसऱ्यांदा परीक्षा दिली होती.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकाल पाहिल्‍यापासून ती घरात कोणाशीच बोलत नव्हती.

दरम्यान, आज सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पल्लवी पुन्हा परीक्षेत अपयशी ठरल्याने तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचलं का  

Back to top button