Online Service Error Pudhari
पुणे

E Search Registration Department: ई-सर्च सेवा आठवडाभर ठप्प; मालमत्तेच्या दस्त तपासणीत वकिलांची मोठी अडचण

नोंदणी विभागाची ऑनलाइन प्रणाली विस्कळीत; आयटी विभागाकडून अपग्रेड सुरू असल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नोंदणी विभागाची ई-सर्च ही सेवा आठवडाभरापासून विस्कळीत झाली आहे. सध्या या यंत्रणेद्वारे जुने दस्त मिळवून तपासणे जवळज‍वळ अशक्यच झाले आहे. नोंदणी विभागाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधला असता ‘आमच्याकडे या संदर्भात तक्रारच आलेली नाही, त्यामुळे सेवा सुरूच आहे ,’ असे सांगण्यात येते. परंतु, विस्कळीत झालेल्या या सेवेमुळे सर्चचे काम करणारा वकीलवर्ग त्रस्त झाला आहे.

कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी या मालमत्तेबाबत तब्बल ३० वर्षांत झालेल्या व्यवहारांची तपासणी करणे गरजेचे असते. त्यामुळे सर्चचे काम करणारे वकील हे सर्व दस्त पाहून त्याबाबतची खातरजमा करून तसा अहवाल आपल्या अशिलास देत असतात.

पूर्वी नोंदणी खात्यातील विभागातील सर्चसाठी केलेल्या विशेष दालनात या दस्तांचे रजिस्टर्स जतन करून ठेवत होते. तेथे जाऊन एकेक दस्ताची पाहणी करून हा अहवाल तयार करावा लागत असे. तथापि, सर्चचे हे काम सोपे करण्यासाठी नोंदणी विभागाने राज्यात नोंदवले गेलेले सर्व दस्त ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

सुरुवातीच्या टप्प्यात २००२ नंतर नोंद झालेले दस्त तर गेल्या काही महिन्यांपासून १९८५ ते २००१ या काळात नोंदविले गेलेले दस्तही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, त्याबाबतही सर्चचे काम करणाऱ्या असंख्य तक्रारी आहेत.

ई- सर्चची ही यंत्रणा दिवसभरात कधी सुरू होईल ते सांगता येत नाही. अनेकदा तर दस्तांचा शोध सुरू असताना मध्येच ती ठप्प होते. त्यामुळे एकाच दस्ताचा वारंवार शोध घ्यावा लागतो. तसेच १९८५ नंतरच्या दस्ताचा शोध दोन- तीन पद्धतीने घेण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेक दस्त येथे उपलब्धच नाहीत.
ॲड. सविता थोरात ई- सर्चच्या संकेतस्थळ अधिक युजर
फ्रेंडली करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे दस्तांचा शोध घेणे अधिक सोपे व वेगवान करण्याचा नोंदणी विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी तयार करून घेतलेले प्रोग्रॅम संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत असून, त्याच्या चाचण्याही घेतल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात संकेतस्थळाचा वेग मंदावला असून कधी कधी ते बंद पडत असावे. परंतु नवीन प्रोग्रॅमच्या चाचण्या पूर्ण होताच सेवाही पूर्ववत व अधिक वेगवान होईल.
अभयसिंह मोहिते, उपमहानिरीक्षक (आयटी), नोंदणी विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT