

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवारी जाहीर केली. या पहिल्या यादीत २ लाख १९ हजार ४१७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच, पहिल्या यादीमध्ये १६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
राज्यात पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादीतील २ लाख ४४ हजार ०९७ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यास क्रमासाठीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत २ लाख १९ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतिक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार पहिल्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विविध पसंतिक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ९८ हजार ०२४ विद्यार्थी असून, ५९ हजार ०७९ विद्यार्थिनी आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आज सोमवार (दि. ३ ऑगस्ट) ते बुधवार (दि. ५ ऑगस्ट २०२६) दरम्यान मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर ६ ऑगस्टला दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर करण्यात येतील.
राज्यात ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून, पहिल्या फेरीसाठी २ लाख १ हजार ०१३ जागा उपलब्ध आहेत. या वर्षी सर्वांत जास्त जागा संगणक अभियांत्रिकीसाठी ३० हजार ९९३ जागा उपलब्ध असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
१६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय
राज्यातील १६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यांचे प्रवेश ऑटो फ्रिज झाले आहेत. या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला, तर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या फेरीत उतरता येणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत म्हणजे संस्थात्मक फेरीत उतरावे लागेल. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांना मिळालेला प्रवेश नाकारणे महागात पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.