

पुणे: छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय (पुरंदर) विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. भूसंपादनासाठी आवश्यक संमतिपत्रे व प्रतिज्ञापत्रे सादर करण्याची अंतिम मुदत आता १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. सध्या ९२ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमती दिली असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही संधी मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये तीन हजार एकर क्षेत्रावर विमानतळ उभारण्यात येणार असून, त्यासाठी १,२१६ हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. या प्रक्रियेसाठी ७ मेपासून शेतकऱ्यांकडून संमतिपत्रे व प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली होती. तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतरही काही शेतकऱ्यांकडून कागदपत्रे सादर होणे बाकी आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, उर्वरित सात ते आठ टक्के शेतकरी संमती देण्यास तयार आहेत; मात्र कौटुंबिक वाद, वैयक्तिक अडचणी आणि इतर कारणांमुळे त्यांना विलंब होत आहे. या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि शासनाच्या आकर्षक मोबदला पॅकेजचा लाभ त्यांनाही मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्तापर्यंत १,२१६ हेक्टरपैकी १,१२५ हेक्टर (९२.५ टक्के) जमिनीसाठी संमती मिळाली आहे. त्यापैकी ६३० हेक्टर क्षेत्राच्या मालकांच्या खात्यात मोबदल्याची रक्कम जमा करण्यात आली असून, हे प्रमाण ५२ टक्के आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना २,६०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
राज्य शासनाने यासाठी जिल्हा प्रशासनाला ३,१५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून, सध्या प्रशासनाकडे ५०० कोटी रुपये शिल्लक आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, काही शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे प्रतिज्ञापत्रे सादर करण्यास विलंब होत आहे. त्यांच्याकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, आता १६ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्रे जमा करता येतील.