पुणे: नागरिकांना सर्टिफाइड दस्त (प्रमाणित प्रत) घरबसल्या ‘ई प्रमाण’ या पोर्टलवर उपलब्ध करून दिल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आता हेच पोर्टल बँकांना उपलब्ध करून देणार आहे. यामुळे घरावर कर्जासाठी नागरिकांनी अर्ज केल्यानंतर त्यांनी सादर केलेला दस्त खरा आहे का? याची सत्यता पडताळणी करणे बँकांना शक्य होणार आहे. त्यामुळे बँकांना कर्ज वाटप करताना, तर नागरिकांना विनाविलंब कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून नुकतीच नागरिकांना नोंदणीकृत दस्तऐवजाच्या प्रमाणित प्रती घरबसल्या मिळवून देण्यासाठी ‘ई प्रमाण’ ही प्रणाली राज्यात लागू केली आहे. त्या पुढे पाऊल टाकत येत्या महिनाभरात हे पोर्टल बँकांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून दस्ताबाबतची सर्व माहिती बँकांना त्यामुळे उपलब्ध होणार आहे. परिणामी, एकाच मालमत्तेवर अनेक बँकांकडून कर्ज घेता येणार नाही. यातून बँकांची होणारी फसवणूक टळणार आहे. तसेच, दस्ताबाबत होणार्या सर्व कार्यवाहीचा इतिहास या तंत्रज्ञानातून ठेवला जाणार आहे. त्यातून संबंधित मालकाचीही फसवणूक टळणार आहे. या दस्ताच्या प्रत्येक पानावर दुय्यम निबंधकाची डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे दस्तामधील पानात अदलाबदल करणेही शक्य होणार नाही.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘ई प्रमाण’ नागरिकांना घरबसल्या उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी सुरू केली आहे. ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आलेले दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या या पोर्टलवर संरक्षित करण्यात येत आहेत. केवळ दस्त क्रमांक दिल्यानंतर बँकांना दस्ताची पडताळणी करता येणार आहे. यासाठी बँकांना या पोर्टलवर लॉगिनची सुविधा दिली जाणार आहे. दस्त क्रमांक दिल्यानंतर बँका या लॉगिनमधून दस्त खरा किंवा खोटा, याची पडताळणी करू शकणार आहेत. याच दस्ताच्या आधारे बँका संबंधित ग्राहकाला कर्ज देतील.
बँकेने कर्ज दिल्यानंतर त्याची नोंद, मालकी हक्कात बदल झाल्यानंतर फेरफारद्वारे सातबारा उतारा व मालमत्ता पत्रकात होणारी नोंद तसेच काही कारणास्तव मालमत्ता वादग्रस्त झाल्यास बँकेकडून अथवा तपास यंत्रणांकडून मालमत्तेवर येणारी टाच, याची देखील नोंद या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवता येणार आहे. दस्तामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांची देखील नोंद यात ठेवली जाणार आहे. तसेच, एखाद्या मालमत्तेवर एकदा कर्ज घेतल्यानंतर दुसर्या बँकांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास ब्लॉकचेनमुळे ते देखील उघड होणार असल्याने बँकांची फसवणूक टळणार आहे.
‘ई प्रमाण’ पोर्टलचे लॉगिन येत्या महिनाभरात बँकांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना बँकांकडून होणारा मनस्ताप कमी होईल.अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक