पुणे

नारायणगाव : डुप्लिकेट नवरीसह सहा जणांची टोळी गजाआड

अमृता चौगुले

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एकाच मुलीचे जुन्नर तालुक्यातील दोन तरुणांबरोबर दीड महिन्यात नाव बदलून वेगवेगळे विवाह लावून दोघांचीही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या टोळीतील बनावट नवरीसह सहा जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली. जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर व नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी ही माहिती दिली.

डुप्लिकेट नवरी जयश्री घोटाळे (वय 35, रा. मुरंबी, शिरजगाव, जि. नाशिक), डुप्लिकेट मावशी मीरा विसलकर (वय 39), तुकाराम मांगते (वय 23, दोघेही रा. अंबुजावाडी, जि. नाशिक), बाळू काळे (वय 46, रा. बोटा, जि. नगर), एजंट शिवाजी कुरकुटे (वय 64, रा. कुरकुटेवाडी, जि. नगर), बाळू सरवदे (वय 41, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्याद सागर वायकर (वय 33, रा. गुंजाळवाडी, जुन्नर) व हरीश गायकवाड (वय 35, रा. खोडद, जुन्नर) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली होती.

लग्नाळू मुलांचे डुप्लिकेट मुलीबरोबर विवाह लावून देणार्‍या टोळीचा जुन्नर तालुक्यात सुळसुळाट झाला होता. आरोपींनी अशाप्रकारे सागर वायकर यांच्याबरोबर 10 मे 2023 रोजी जुन्नर येथे, तर हरीश गायकवाड यांच्याशी 28 मे 2023 रोजी आळंदीत तरुणीचे नाव बदलून विवाह लावून दिला होता. विवाह जुळविण्यासाठी टोळीने वायकर यांच्याकडून 1 लाख 30 हजार, तर हरीशकडून 1 लाख 60 हजार रुपये घेतले होते. नवरी लग्नानंतरच्या धार्मिक विधीनंतर माहेरी गेली. मात्र, नंतर पुन्हा सासरी येण्यास तिने नकार दिला. फसवणूक झाल्याचे कळताच दोघा तरुणांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी चौधर यांनी पथक तयार केले. पथकाने संगमनेर, नाशिक, बोटा आदी ठिकाणांवरून आरोपींना ताब्यात घेतले. तपास पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक विनोद धुर्वे आदींनी केला.

जुन्नर तालुक्यातील इतर कोणत्याही तरुणांची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.

रवींद्र चौधर, उपविभागीय पोलिस अधिकारी, जुन्नर

हेही वाचा

SCROLL FOR NEXT