कचर्‍याचे जळण नव्हे; हे तर पुणेकरांचे मरण! Pudhari
पुणे

कचर्‍याचे जळण नव्हे; हे तर पुणेकरांचे मरण!

पालिकेच्या मोजक्याच कारवायांमुळे उघड्यावर कचरा पेटवणार्‍यांना उरली नाही भीती

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: शहरातील हवाप्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने नुकत्याच फॉग कॅनन मशिन घेतल्या. त्याद्वारे हवेत पाणी मारून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, शहरातील गोळा केलेला कचरा पेटवून दिला जात असल्याने पालिकेच्या या प्रयत्नांना हरताळ फासला जात आहे.

याला बेजबाबदार नागरिक व पालिकेचे अधिकारी कारणीभूत आहेत. मोजक्याच लोकांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने या घटना कमी होण्याऐवजी वाढत आहेत. दरम्यान, कचरा ज्वलनामुळे श्वसनविकारांसोबत आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

शहरातील उपनगरांत कचर्‍याचा प्रश्न गंभीर आहे. हा कचरा नियमित गोळा केला जात नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करीत आहेत. पालिकेचे ठेकेदार हा कचरा योग्य पद्धतीने गोळा करीत नाहीत तसेच गोळा केलेला कचरा एका ठिकाणी आणून जाळला जात आहे. यातील धुरामुळे हवाप्रदूषणाची पातळी वाढत आहे.

शहरात स्वच्छता कर्मचार्‍यांकडून कचरा गोळा केला जातो. मात्र, तो उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरते. श्वास घेताना त्रास होणे, अशा अनेक तक्रारी नागरिक करीत आहेत. पुणे शहरात नदीपात्र, विविध घाट, पूल, नाले, राष्ट्रीय महामार्ग, कॅनॉलमध्ये कचरा टाकण्याचे व जाळण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रमुख रस्त्याला लागून कचरा उघड्यावरच टाकून तो जाळला जात आहे. यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. याचा त्रास रहिवाशांना व येणार्‍या-जाणार्‍यांना होत आहे.

2023 मध्ये करण्यात आलेली कारवाई

कचरा जाळणे

  • 1263 जणांवर कारवाई

  • 709100 दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे

  • 30129 जणांवर कारवाई

  • 9565028 दंड वसूल

2024 मध्ये करण्यात आलेली कारवाई

कचरा जाळणे

  • 564 जणांवर कारवाई

  • 513500 दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे

  • 38537 जणांवर कारवाई

  • 19467189 दंड वसूल

2025 मध्ये मार्चपर्यंत करण्यात आलेली कारवाई

कचरा जाळणे

  • 29 जणांवर कारवाई

  • 145000 दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे

  • 11951 जणांवर कारवाई

  • 6766364 दंड वसूल

दिवसाला केवळ तीन, चार कारवाया

मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये सर्रास ओला व सुका कचरा जाळला जातो. कचरा जळल्यावर मोठी दुर्गंधी निर्माण होते. महापालिकेचे 15 क्षेत्रीय कार्यालये मिळून एका दिवसात काही मोजक्या कारवाया करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई करण्याचे प्रमाण वाढवले तरी रोज 50 ते 60 जणांवर कारवाई केली जाऊ शकते व कचरा पेटवण्याचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. मात्र, रोज तीन ते चार जणांवर कारवाई केली जाते. गेल्या तीन वर्षांत कारवाईचे प्रमाण कमी असून, दंड देखील मोजकाच वसूल केला जात आहे.

पालिकेची पथके

महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय उघड्यावर कचरा जाळणार्‍यांवर व फेकणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार केली आहेत. या पथकांची कारवाईची जबाबदारी असताना देखील वारंवार उघड्यावरच कचरा पेटवला जातो. कारवाई केल्याचे दाखवण्यासाठी केवळ बोटावर मोजण्याइतक्या कारवाया करून निघून जात आहेत.

हा घ्या पुरावा...

नीलायम पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. या कचर्‍याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. मात्र, हा कचरा जाळून टाकला जात आहे. यामुळे या पुलावरून येणार्‍या-जाणार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे.

सूस परिसरात कचरा डेपो शेजारी असताना मुंबई हायवेकडे जाणार्‍या मार्गाशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. हा कचरा उचलणे पालिकेची जबाबदारी आहे. सूस गाव आता पालिकेत आले आहे. त्यामुळे येथील कचर्‍याचा प्रश्न सोडवणे पालिकेची जबाबदारी आहे. हा कचरा उघड्यावरच जाळला जातो. यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- बापू ससार, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT