पुणे: पणन संचालकांनी कांदा-बटाटा बाजारात येणार्या पोत्यात 50 किलोचा माल असावा, त्यापेक्षा अधिक माल पोत्यात भरता येणार नाही, अशा सूचना राज्यातील सर्व बाजारपेठांना देण्यात येणार असल्याचे आश्वासन शनिवारी दिले. त्यामुळे ’मार्केट यार्डातील कामगार संघटने’तर्फे येत्या 2 मे पासून पुकारण्यात आलेले काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली.
कांदा-बटाटा विभागात येणारा माल 50 किलोच्या स्वरूपात यावा, पोत्यात अधिकचा माल भरला जात असल्यामुळे कामगारांच्या मनका आणि गुडघ्याला त्रास होत आहे. त्यामुळे परिपत्रक काढून पोत्यात 50 किलो माल भरण्याच्या सूचना करण्याची विनंती ’कामगार संघटने’कडून पणन संचालकांना करण्यात आली. ही सूचना त्यांनी मान्य केली.
पणन संचालक यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांकरिता पुन्हा एकदा परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात येईल, असे सांगितले. तसेच या संदर्भात राज्यातील वर्तमानपत्रांत आवाहन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सवलतीच्या दरात चांगला बारदान (पिशवी) बाजार समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल का? याबाबत पणन संचालकांनी मत व्यक्त केले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर, कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, कामगार युनियन सचिव विशाल केकाणे, उपाध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते.