

Latest Weather Update News
पुणे: अतितापमानामुळे यंदा पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड वेगाने सुरू आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडून दमट वारे सुरू झाल्याने आगामी दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात हळुवारपणे घट दिसेल.
काही भागांत हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज व्यक्त करत हवामान विभागाने विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांत 27 व 28 एप्रिल रोजी गारपिटीचा इशारा दिला आहे. दरम्यान, शनिवारी ब्रह्मपुरीचा 45.5 अंशावर काहीसा खाली आला.
यंदा संपूर्ण मार्च महिना आणि एप्रिलचे सर्वच दिवस प्रचंड उकाडा जाणवत आहे. सरासरी तापमान 42 ते 43 अंशांवर गेले आहे. विदर्भ अन् मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा 45 अंशांवर आहे. तसेच अरबी समुद्राचेही तापमान 31 अंशांवर गेल्याने त्या भागातून दमट वारे राज्यात येत आहे.
त्यामुळे 26 ते 29 एप्रिल या तीन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होईल. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस, तर बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 27 व 28 एप्रिल रोजी विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारचे तापमान...
ब्रह्मपुरी 45.5, चंद्रपूर 45.4, अकोला 45.1, अमरावती 44.6, परभणी 44.4, नागपूर 44, वर्धा 44.1, यवतमाळ 44.4, वाशिम 43.4, पुणे (शिवाजीनगर 40.1, लोहगाव 42.7), जळगाव 43.1, कोल्हापूर 32.1, महाबळेश्वर 31.9, मालेगाव 43.2, नाशिक 39, सांगली 35, सातारा 39.2, सोलापूर 42.1, धाराशिव 42.2, छ. संभाजीनगर 42.4, बीड 43.6, बुलडाणा 40.6, गोंदिया 42.6, मुंबई (कुलाबा) 33, सांताक्रुझ 34.3, रत्नागिरी 33.4.