पुणे: पुण्यातील बाणेर येथे टाटा यांच्यामार्फत खासगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येत आहे. मात्र, या भूखंडावर आजूबाजूच्या काही बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला होता. हा राडारोडा काढण्यास महापालिका दुर्लक्ष करत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 25) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संताप व्यक्त केल्यानंतर पालिकेची यंत्रणा हालली असून, एका रात्रीत हा भूखंड चकाचक करण्यात आला आहे.
जवळपास पाच ते सहा मोठे पोकलेन, 16 ते 17 डंपरच्या साह्याने राडारोडा हटवण्यात आला. बाणेर येथे टाटा ग्रुपतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यासाठी सरकारच्या आदेशानुसार महापालिकेची जागा देण्यात आली होती.
मात्र, या जागेवर परिसरातील विविध बांधकामावरील राडारोडा टाकण्यात आला होता. त्यामुळे हा राडारोडा महापालिकेने काढून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे पालिका अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे या सेंटरचे काम रखडले होते. दरम्यान, हा विषय उपमुख्यमंत्री पवार यांना कळला. त्यांनी थेट पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना कडक शब्दांमध्ये सुनावत तीन दिवसांत राडारोडा हटवा. तीन दिवसांनंतर भूमिपूजनासाठी मी येईन असे सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांची तंबी येताच पालिकेची यंत्रणा कामाला लागली आणि एका रात्रीत या भूखंडावरील राडारोडा काढण्यात आला. यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने जेसीबी, डंपरच्या साह्याने राडारोडा उचलला. तब्बल 500 डंपर राडारोडा निघाला.
अधिकार्यांनी केली सफाईच्या कामांची पाहणी
दरम्यान साफसफाई करण्यात आलेल्या कामाची आज महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले व शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रीतम गंजेवार यांनी केली. हे काम व्यवस्थित झाले की नाही हेदेखील त्यांनी पाहिले. या जागेवरून धुरळा उडू नये, यासाठी पाण्याचीदेखील फवारणी करण्यात आली.