लोणी-धामणी(पुणे);पुढारी वृत्तसेवा : आंबेगावच्या तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. पावसाळ्याचे जून, जुलै हे दोन महिने संपून ऑगस्टचा पहिला आठवडादेखील उलटला तरी मांदळेवाडी, वडगावपीर, पहाडदरा, शिरदाळे, धामणी, लोणी आदी गावांत पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जलस्रोत आटले असून, शेतीपिकांना पाणी देणेही मुश्कील बनले आहे. दुसरीकडे शेतकर्यांना चार्याअभावी पशुधनाचे पालनपोषण करणेदेखील अवघड झाले आहे.
जून महिन्यात काही प्रमाणात पडलेल्या पावसाच्या ओलीवरच बाजरी, मूग, भुईमूग व इतर पिकांची पेरणी केली. पण नंतर पावसाने दडी मारल्याने उगवून आलेले पीक पाण्याअभावी जळू लागले आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या भागातील दृष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चार्यासाठी थेट अनुदान द्यावे, अशी मागणी वडगावपीरचे माजी सरपंच संजय पोखरकर, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, धामणीचे माजी सरपंच सागर जाधव, शिरदाळ्याचे मार्जी उपसरपंच मयूर सरडे यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही, तर या भागातील शेतकर्यांना जनावरांसह स्थलांतर करावे लागेल, असेही शेतकर्यांनी सांगितले.
हेही वाचा