पुणे

बंदिस्त जलवाहिनी नकोच ! मावळमध्ये सर्वपक्षीय एकवटले

अमृता चौगुले

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा रू पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे मावळ तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून, या पार्श्वभूमीवर बुधवारी (13) रोजी सोमाटणे फाटा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वांनीच मबंदिस्त जलवाहिनी नकोच अशी स्पष्ट भूमिका घेऊन सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शुक्रवार, दि. 15 रोजी वडगाव मावळ येथे तहसील कार्यालयावर सर्व पक्षीय कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या :

सोमाटणे फाटा येथे झालेल्या या बैठकीस माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रिपाईचे नेते सूर्यकांत वाघमारे, ज्येष्ठ नेते सोपानराव म्हाळसकर, ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रभारी भास्कर म्हाळसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, किशोर भेगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, शिवसेना ठाकरे गटाचे भारत ठाकूर, शिवसेना शिंदे गटाचे शरद हुलावळे, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी, सर्वच राजकीय पक्षाच्या राज्य सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळ तालुक्यातील नेते, शेतकरी यांना विश्वासात न घेता स्थगिती उठविण्याचा घेतलेल्या निर्णयावरून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तब्बल 12 वर्षे सातत्याने हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पाठपुरावा सुरू असताना तो रद्द करण्याऐवजी त्यावरील स्थगिती उठविल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना याबाबत जाब विचारणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

आम्हाला हा प्रकल्पच नको, अशी ठाम भूमिका सर्वांनीच या वेळी मांडली. मोर्चा, उपोषण, द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको, पिंपरी चिंचवड शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करणे अशी आंदोलने करून सरकारला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. अखेर सर्वानुमते शुक्रवार, दि. 15 रोजी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT