पुणे : पावसाळ्यात पाणी वाहून जावे, यासाठी दरवर्षी पावसाळी वाहिन्या, नाले आणि ड्रेनेजची सफाई महापालिकेमार्फत केली जाते. मात्र, काढण्यात आलेली घाण ड्रेनेजशेजारीच टाकण्यात येत असल्याने ही घाण पुन्हा ड्रेनेजमध्ये जात असल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे अखेर पालिका प्रशासनाला जाग आली असून, ड्रेनेजची घाण न उचलता तेथेच टाकून देणाऱ्या ठेकेदारांची बिले काढू नका, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि ड्रेनेजसफाई केली जाते. याही वर्षी ड्रेनेजसफाई व नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी ही कामे सुरू आहेत. या कामासाठी निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. मात्र, या निविदा नियोजित रकमेपेक्षा या निविदांची किंमत ४० टक्क्यांनी कमी असल्यामुळे सफाईचा दर्जा राखला जाणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पावसाळी वाहिन्या व ड्रेनेज साफ करीत असताना ठेकेदार काढलेली घाण ड्रेनेजशेजारीच टाकत होता. त्यामुळे ही घाण पुन्हा ड्रेनेजमध्ये जात होती. शुक्रवारी पुण्यात झालेल्या पावसामुळे ही घाण पुन्हा ड्रेनेजमध्ये गेली असून, यामुळे ठेकेदाराचे फावले आहे.
दरम्यान, याबाबत पालिका प्रशासनाला माहिती दिल्यावर या कामांवर लक्ष ठेवले जाईल, असे सांगून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वत:चा बचाव केला होता. त्यानंतर ड्रेनेजलाइन, पावसाळीलाइन तसेच गटारांमधून काढण्यात आलेला गाळ दुसऱ्या ठिकाणी टाकल्याचा फोटो दाखविल्यानंतरच पैसे दिले जातील, असे देखील प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, हा गाळ टाकण्यासाठी पालिकेने जागा सुचवावी, असे ठेकेदारांनी सांगितले होते. परंतु, पालिकेला जागा नेमकी कुठे द्यावी, असा प्रश्न पडला होता. त्यामुळे ही घाण जेथून काढण्यात आली त्या ड्रेनेजशेजारीच ठेवण्यात आली. मात्र, झालेल्या पावसामुळे ही घाण उचलून कोठे टाकावी, हा ठेकेदाराला पडलेला प्रश्न पावसाने सोडवला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना माहिती दिल्यावर त्यांनी अशा ठेकेदारांची बिले काढू नका, असे आदेश दिले आहेत.
पुणे महानगरपालिकेने पावसाळीपूर्व ड्रेनेजलाइन व नालेसफाई करण्यासाठी निविदा दिल्या असून, स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, ही घाण ड्रेनेजशेजारी टाकण्यात येत असल्याने अशा ठेकेदारांवर कारवाई करून त्यांची बिले देऊ नका, असे आदेश आयुक्त भोसले यांनी दिले आहेत.
पावसाळीलाइन व ड्रेनेजलाइनची योग्यप्रकारे साफसफाई केली जात नाही. यावर्षी ही कामे पालिकेने पावसाळ्यापूर्वी सुरू केली आहेत. ही कामे सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने काढलेला गाळ तिथेच ठेवला होता. काढलेला गाळ कोठे टाकावा, असा प्रश्न ठेकेदाराला पडला होता. शुक्रवारी पावसाने शहरातील विविध भागांत दमदार हजेरी लावली. पाण्याच्या प्रवाहात काढलेला गाळ पुन्हा ड्रेनेजमध्ये वाहून गेला. सहकारनगर, बिबवेवाडी, स्वारगेट, येरवडा आदी भागांत ही परिस्थिती होती.